अमिताभ बच्चन यांनी दिलेली ‘ती’ वस्तू नाना पाटेकरांनी आजही ठेवलीय जपून
Nana Patekar Meets Amitabh Bachhan : अभिनेते अमिताभ बच्चन यांनी एक वस्तू नाना पाटेकर यांना दिली होती. ती वस्तू नाना पाटेकर यांनी आजही जपून ठेवली आहे. 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमात बोलताना नाना पाटकर यांनी जुना किस्सा सांगितला. वाचा सविस्तर बातमी....
अभिनेते नाना पाटेकर हे दिलखुलासपणे वेगवेगळ्या गोष्टींवर त्यांची मतं मांडत असतात. नुकतंच बिग बी अमिताभ बच्चन यांनी दिलेल्या एका वस्तू बद्दल नाना पाटेकरांनी सांगितलं. एक दिवस अमितजी एक मस्त शर्ट घालून आले होते. मी त्यांना तसं सांगितलं तेव्हा ते म्हणाले की तो अभिषेकचा शर्ट आहे. संध्याकाळी अमितजी निघून गेल्यानंतर मला निघायला जरा उशीर झाला होता. माझ्या शूटनंतर जेव्हा मी माझ्या व्हॅनिटीमध्ये गेलो, तेव्हा तो शर्ट तिकडे हँगरवर लावून ठेवला होता. आजही तो शर्ट माझ्याकडे आहे, असं नाना पाटेकर यांनी सांगितलं.
‘नाना’ बनण्याचा किस्सा
नाना पाटेकर यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा आणखी एक किस्सा सांगितला. ‘नाना’ शब्दाशी निगडीत हा किस्सा सांगितला. आम्ही ‘कोहराम’ चित्रपटाचे शूटिंग करत होतो. एक दिवस अमितजी आले आणि सगळ्यांना मिठाई देऊ लागले. मी त्यांना विचारले की काय बातमी आहे? त्यावर ते म्हणाले, माझ्या मुलीला बाळ झाले, मी नाना झालो! त्यावर आपल्या विनोदबुद्धीबद्दल ओळखल्या जाणाऱ्या नानाने टिप्पणी केली, किती तरी वर्षं झाली, मी तर जन्मापासूनच नाना आहे!, असं नाना पाटेकरांनी सांगितलं. नाना पाटेकरांनी ही आठवण सांगताच एकच हशा पिकला.
नाना पाटेकर ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये येणार
नाना पाटेकर यांचा ‘वनवास’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने नाना पाटेकर ‘कौन बनेगा करोडपती’ या रिअॅलिटी शोमध्ये आले होते. तेव्हा त्यांनी हा किस्सा सांगितला. ‘वनवास’ सिनेमाच्या निमित्ताने अभिनेते नाना पाटेकर, उत्कर्ष शर्मा, सिमरत कौर आणि लेखक-दिग्दर्शक अनिल शर्मा उपस्थित ‘कौन बनेगा करोडपती’ शोमध्ये आले होते.
नाम फाऊंडेशनसाठी खेळत असताना नाना पाटेकर त्यांच्या जिव्हाळ्याच्या मुद्द्यांबद्दल बोलताना दिसले. शेतकऱ्यांची आत्महत्या रोखण्यासाठी जागरूकता आणून त्यासाठी निधी उभारण्याचा नाना पाटेकरांचा उद्देश आहे. तसंच अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या जुन्या आठवणींनाही नाना पाटेकर यांनी उजाळा दिला.