Ajay Devgn ‘आता हिंदी भाषा कुठे गेली?’; अजयने किच्चा सुदीपशी भांडण मिटवलं पण आता नेटकरी ‘सिंघम’वर भडकले
हिंदी भाषेवरून अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) आणि किच्चा सुदीप (Kiccha Sudeep) यांच्यात चांगलंच ट्विटरवॉर रंगलं. हिंदी (Hindi) ही राष्ट्रभाषा नाही, असं सुदीपने म्हटलं होतं. त्यावर अजयने ट्विट करत प्रतिक्रिया दिली होती.
हिंदी भाषेवरून अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) आणि किच्चा सुदीप (Kiccha Sudeep) यांच्यात चांगलंच ट्विटरवॉर रंगलं. हिंदी (Hindi) ही राष्ट्रभाषा नाही, असं सुदीपने म्हटलं होतं. त्यावर अजयने ट्विट करत प्रतिक्रिया दिली होती. ‘सुदीप माझ्या भावा, तुझ्या मते जर हिंदी ही आपली राष्ट्रीय भाषा नसेल तर तुमच्या मातृभाषेतील चित्रपट हिंदीमध्ये डब का केले जातात? हिंदी आमची राष्ट्रीय भाषा होती, आहे आणि कायम राहील. जन गण मन,’ अशा शब्दांत अजयने उत्तर दिलं होतं. अजयच्या या ट्विटवर सुदीपनेही त्याची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आणि काहीतरी गैरसमज झाल्याचं त्याने म्हटलं. आता अजयने हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला असून त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. हिंदी भाषेवरून झालेला वाद मिटवताना मात्र अजयने इंग्रजीत ट्विट केल्याची बाब नेटकऱ्यांना काही रुचली नाही.
किच्चा सुदीपची प्रतिक्रिया-
‘अजय सर, मला वाटतं की माझा मुद्दा खूप वेगळ्या पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचला आहे. कदाचित आपली समोरासमोर भेट होईल तेव्हा मी माझा मुद्दा तुमच्यासमोर नीट मांडू शकेन. माझा हेतू कुणालाही दुखावण्याचा, चिथावणी देण्याचा किंवा वाद घालण्याचा नव्हता आणि मी असं का करेन?’, असं सुदीप म्हणाला होता. त्यावर आता अजयने प्रतिक्रिया दिली आहे.
वाचा ट्विट-
.@KicchaSudeep मेरे भाई, आपके अनुसार अगर हिंदी हमारी राष्ट्रीय भाषा नहीं है तो आप अपनी मातृभाषा की फ़िल्मों को हिंदी में डब करके क्यूँ रिलीज़ करते हैं? हिंदी हमारी मातृभाषा और राष्ट्रीय भाषा थी, है और हमेशा रहेगी। जन गण मन ।
— Ajay Devgn (@ajaydevgn) April 27, 2022
वाचा ट्विट-
‘सुदीप तू माझा मित्र आहेस. गैरसमज दूर करण्यासाठी तुझे आभार. ही संपूर्ण फिल्म इंडस्ट्री एकच आहे, असा मी नेहमीच विचार केला. आम्ही सर्व भाषांचा आदर करतो आणि सर्वांनी आमच्या भाषेचाही आदर करावा अशी अपेक्षा करतो. पण कदाचित काही गैरसमज झाला असावा’, असं अजयने म्हटलं. हे म्हणताना मात्र त्याने इंग्रजीत ट्विट केल्याने नेटकऱ्यांनी तोच मुद्दा उचलून अजयला ट्रोल केलंय.
Hi @KicchaSudeep, You are a friend. thanks for clearing up the misunderstanding. I’ve always thought of the film industry as one. We respect all languages and we expect everyone to respect our language as well. Perhaps, something was lost in translation ?
— Ajay Devgn (@ajaydevgn) April 27, 2022
‘आता तुझी हिंदी भाषा कुठे गेली’, असा टोला एका नेटकऱ्याने अजयला लगावला. तर ‘उशिरा सुचलेलं शहाणपण’ असं दुसऱ्याने म्हटलं. ‘भांडण करताना हिंदीत ट्विट आणि आता मिटवताना इंग्रजीत का’, असंही एका युजरने लिहिलं.