अभिनेता अर्जुन कपूर आणि जॉन अब्राहम यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘एक व्हिलन रिटर्न्स’ (Ek Villain Returns) हा चित्रपट आज बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. तर दुसरीकडे कन्नड स्टार किच्चा सुदीपचा पॅन इंडिया चित्रपट ‘विक्रांत रोना’ (Vikrant Rona) गुरुवारीच प्रदर्शित झाला. हा चित्रपट साऊथमध्ये चांगली कमाई करत आहे, तर हिंदीमध्ये त्याचं कलेक्शन अपेक्षेप्रमाणे झालं नाही. पण यापूर्वी बॉक्स ऑफिसवर खराब कामगिरी करणाऱ्या चित्रपटांच्या तुलनेत ‘विक्रांत रोना’ने ठीकठाक कमाई केली आहे. याशिवाय गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या रणबीर कपूरच्या ‘शमशेरा’ची (Shamshera) अवस्था अत्यंत वाईट आहे. तर इतर दोन साऊथ चित्रपट ‘थँक यू’ आणि ‘मलयकुंजू’ देखील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत.
किच्चा सुदीप आणि जॅकलिनचा ‘विक्रांत रोना’ हा चित्रपट हिंदी भाषेत फारसा गाजला नाही, पण कन्नडमध्ये या चित्रपटाने अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली आहे. ‘विक्रांत रोना’ रिलीज होण्यापूर्वी या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर बंपर ओपनिंग मिळू शकतं, असा अंदाज वर्तवला गेला होता. मात्र पहिल्याच दिवशी या चित्रपटाने सर्व भाषांमध्ये मिळून एकूण 16.50 कोटी रुपयांची ओपनिंग केली आहे.
रणबीर कपूरचा शमशेरा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरल आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला नाही. यशराज फिल्म्सचा हा पीरियड ड्रामा प्रेक्षकांना अजिबात आवडलेला नाही. 2018 मध्ये ‘संजू’मधून कोट्यवधींची कमाई केल्यानंतर चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर परतलेल्या रणबीर कपूरच्या चित्रपटाने सातव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर केवळ 1.80 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 41.77 कोटी रुपये झालं आहे.
नागा चैतन्यची मुख्य भूमिका असलेला थँक्यू हा चित्रपट दक्षिणेतील या वर्षातील सर्वात फ्लॉप चित्रपट ठरला आहे. याआधीही नागा चैतन्यचे जवळपास 6-7 चित्रपट फ्लॉप ठरले आहेत. थँक्यू या चित्रपटाने सुरुवातीच्या वीकेंडमध्ये फक्त 3 कोटी रुपयांची कमाई केली. ही नागा चैतन्यच्या चित्रपटासाठी आतापर्यंतची सर्वात कमी कमाई आहे. या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 9.43 कोटी रुपये झालं आहे.
फहाद फासिलचा सर्व्हायव्हल ड्रामा चित्रपट ‘मलयकुंज’ सुरुवातीला प्रेक्षकांना आवडला असेल, पण हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला आहे. याचं दिग्दर्शन साजिमोन प्रभाकरन यांनी केलं आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाच्या कमाईत सातत्याने घट होत आहे. मलयकुंजची आकडेवारी गुरुवारी समोर आली आहे. या चित्रपटाचा सातव्या दिवशी एकूण 7.28 कोटींचा व्यवसाय झाला आहे.
बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम, अर्जुन कपूर, दिशा पटानी आणि तारा सुतारिया यांचा चित्रपट ‘एक व्हिलन रिटर्न्स’ आज रिलीज झाला आहे. हा चित्रपट सिद्धार्थ मल्होत्रा, श्रद्धा कपूर, रितेश देशमुख यांच्या भूमिका असलेल्या ‘एक व्हिलन’चा सीक्वेल आहे. मोहित सुरी दिग्दर्शित ‘एक व्हिलन रिटर्न्स’ हा चित्रपट जवळपास 70 ते 80 कोटींच्या बजेटमध्ये बनला आहे. पहिल्याच दिवशी हा चित्रपट 10 ते 12 कोटींचा गल्ला जमवेल अशी अपेक्षा आहे.