‘वडील जिवंत असेपर्यंत हिस्सा मागण्याचा कोणताही अधिकार नाही!’, गायिकेला वडिलांचे घर सोडण्याचा आदेश!
ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या मुलांकडून होत असलेल्या गैरवर्तनाबद्दल गंभीर चिंता व्यक्त करत, मुंबई उच्च न्यायालयाने गायिका श्वेता शेट्टीला (Shweta Shetty) तिच्या 95 वर्षीय वडिलांच्या दक्षिण मुंबई स्थित निवासस्थानातून बाहेर काढण्याचा न्यायाधिकरणाचा आदेश रद्द करण्यास नकार दिला आहे.
मुंबई : ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या मुलांकडून होत असलेल्या गैरवर्तनाबद्दल गंभीर चिंता व्यक्त करत, मुंबई उच्च न्यायालयाने गायिका श्वेता शेट्टीला (Shweta Shetty) तिच्या 95 वर्षीय वडिलांच्या दक्षिण मुंबई स्थित निवासस्थानातून बाहेर काढण्याचा न्यायाधिकरणाचा आदेश रद्द करण्यास नकार दिला आहे. गायिका श्वेता शेट्टी तिच्या वृद्ध वडिलांसोबत गैरवर्तन करत असल्याचा आरोप करण्यात आला होता.
शेट्टीवर तिच्या वडिलांसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप झाल्यानंतर न्यायाधिकरणाने तिला तिच्या वडिलांचे निवासस्थान सोडण्याचे आदेश दिले होते. न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठाने 25 नोव्हेंबरला सांगितले की, जोपर्यंत गायिकेचे वडील जिवंत आहेत, तोपर्यंत ती त्यांच्या मालमत्तेवर कोणताही हक्क सांगू शकत नाही.
काय म्हणाले कोर्ट?
सोमवारी (30 नोव्हेंबर) प्राप्त झालेल्या न्यायालयाच्या आदेशात म्हटले आहे की, ‘श्वेता तिचा हिस्सा मागत आहे. जोपर्यंत ते (वडील) जिवंत आहे तोपर्यंत त्यांचा ‘भाग’ कोणता? ते (वडील) आपला फ्लॅट आणि सर्व पैसे दुसऱ्याला देऊ शकतात. ही त्यांची वैयक्तिक निवड असेल. मुलगी (श्वेता) त्यांना असे करण्यापासून रोखू शकत नाही. त्यामुळे जोपर्यंत श्वेताचे वडील जिवंत आहे, तोपर्यंत श्वेताला त्यांच्या संपत्तीत वाटा मागण्याचा कोणताही अधिकार नाही.’
न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, मुंबईत विशेषत: सधन-पैसेवाल्या लोकांच्या घरात ज्येष्ठ नागरिक आणि वृद्ध पालकांना आयुष्याच्या शेवटच्या क्षणी खूप त्रास सहन करावा लागतो, असे अनेकदा दिसून आले आहे.
मुलगी घरात नको ही वडिलांची इच्छा!
आदेशात म्हटले आहे की, हे प्रकरण देखील काही वेगळे नाही आणि याचिकाकर्त्याच्या वडिलांनी वारंवार सांगितले आहे की, त्यांची मुलगी श्वेता हिला ते आपल्या घरात पाहू इच्छित नाही. ‘कल्याण न्यायाधिकरण’ आणि मुंबईच्या उपजिल्हाधिकार्यांनी नोव्हेंबर 2020च्या आदेशाला आव्हान देणाऱ्या श्वेता शेट्टीने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने हा निकाल दिला आहे.
आधीच्या आदेशात श्वेता शेट्टींना वडिलांचे घर सोडण्यास सांगितले गेले होते. दक्षिण मुंबईत राहणाऱ्या महालबा शेट्टी (95) यांनी आपली मुलगी श्वेता हिने आपला छळ केल्याचा आरोप केला आहे.