अभिनेता आमिर खानचा (Aamir Khan) नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘लाल सिंग चड्ढा’ (Laal Singh Chaddha) या चित्रपटाला सोशल मीडियावर मोठा विरोध होत असून चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी करण्यात आली होती. रिलीजनंतर या चित्रपटाने विशेष व्यवसाय केला नाही, त्यानंतर तो फ्लॉप चित्रपट असल्याचं म्हटलं जात आहे. या चित्रपटाच्या कमी व्यवसायामुळे काही वितरक (Distributers) आमिर खानकडे नुकसान भरपाईची मागणी करत असल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत. मात्र, या प्रकरणावर चित्रपटाच्या निर्मात्यांची प्रतिक्रिया समोर आली असून त्यांनी या सर्व चर्चा निराधार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
बॉक्स ऑफिसवर ‘लाल सिंह चड्ढा’च्या कमी कमाईमुळे अशा काही बातम्या समोर येत होत्या की या चित्रपटाच्या वितरकांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे. मात्र ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत निर्मात्यांनी सांगितलं की, या सर्व चर्चा खोट्या आहेत. चित्रपटाचं कोणतंही नुकसान झालेलं नाही. वायकॉम 18 स्टुडिओचे सीईओ अजित अंधारे यांनी चित्रपट तोट्यात जात असल्याच्या चर्चांना तथ्यहीन आणि निराधार म्हटलंय.
या मुलाखतीत ते म्हणाले, “चित्रपटात कोणताही बाहेरचा वितरक गुंतलेला नाही आणि तो आमच्या कंपनीद्वारेच वितरित केला जात आहे. आत्तापर्यंत आमचं कोणतंही नुकसान झालेलं नाही. हा चित्रपट आजही देश-विदेशातील चित्रपटगृहांमध्ये सुरू आहे. या सर्व चर्चा निराधार आहेत. बहुतांश मोठ्या स्टुडिओजचं स्वतःचं वितरण नेटवर्क असतं. छोट्या शहरांमध्ये उप-वितरकांचं जाळं असतं जे कमिशन तत्त्वावर काम करतात.
चित्रपट फ्लॉप झाल्याच्या वृत्तांबद्दल उत्तर भारतातील एका थिएटर मालकाने सांगितलं की, “आजकाल बहुतांश मोठे स्टुडिओ हे स्वतःच चित्रपटाचं वितरण करतात. हे काम थेट केलं जातं. आम्ही प्रदर्शनाचे हक्क मागितले तरी ते आम्हाला खूप महागात पडतात. चित्रपटाचे निर्माते स्वतः वितरक असल्याने वितरक पैसे परत मागत आहेत ही बातमी निराधार आहे.”
ई टाइम्सशी बोलताना आणखी एका सूत्राने सांगितलं की, “गेल्या 10 वर्षांत आमिरने एक रुपयाही मानधन घेतलेला नाही. हा चित्रपट जरी तोट्यात गेला तरी त्याचा भार फक्त आमिरवरच असेल, इतर कोणावरही नाही. मात्र चित्रपटाचा निर्मिती खर्च स्टुडिओ आणि प्रॉडक्शन हाऊसने उचलला आहे. ‘लाल सिंग चड्ढा’ बद्दल सांगायचं झालं तर, या चित्रपटाने थिएटरशिवाय इतर माध्यमातून आधीच कमाई केली आहे.”
लाल सिंग चड्ढा फ्लॉप झाल्यामुळे आमिर खानला मोठा धक्का बसला आहे, असं एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं होतं. मात्र इंडस्ट्रीतील एका व्यक्तीने ई टाइम्सशी बोलताना यात काही तथ्य नसल्याचं सांगितलं. “या चित्रपटाने 4 दिवसांच्या वीकेंडला जवळपास 38 कोटींची कमाई केली आहे. सध्या हा चित्रपट थिएटरमध्ये अजूनही सुरू आहे आणि त्यासोबत प्रदर्शित झालेल्या ‘रक्षाबंधन’ पेक्षाही जास्त व्यवसाय लाल सिंग चड्ढाने केला आहे”, असं ती व्यक्ती म्हणाली.