अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो विजयच्या हैदराबादमधल्या (Hyderabad) घरातील आहे. यामध्ये तो अनन्यासोबत सोफ्यावर बसला आहे. त्यांच्या डाव्या बाजूला तीन पंडित उभे आहेत आणि उजव्या बाजूला विजयची आई हिरव्या साडीत पूजेचं ताट सजवताना दिसत आहे. हा फोटो पाहून सोशल मीडियावर काही यूजर्स असा दावा करत आहेत की, ‘लायगर’ हा त्यांचा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांचा साखरपुडा झाला आहे. हे दोघं लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चांनाही उधाण आलं. या व्हायरल फोटोमध्ये अनन्या आणि विजयच्या खांद्यावर लाल रंगाची सिल्क शालही दिसत आहे आणि दोघंही हात जोडून बसलेले आहेत. या फोटोमागचं नेमकं सत्य काय, ते जाणून घेऊयात..
खरं तर विजयच्या आईने त्यांच्या घरी पूजा केली. विजय आणि अनन्याचा ‘लायगर’ हा चित्रपट 25 ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. त्यापूर्वी माधवी देवरकोंडा यांनी बुधवारी त्यांच्या हैदराबाद इथल्या घरी पूजा केली. ही पूजा मुलांच्या आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी होती. त्यामुळेच फोटोमध्ये माधवी या पूजेचं ताट सजवताना दिसत आहेत. अनन्या आणि विजय हे दोघं मिळून चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहेत. त्यासाठी ते भारतातील विविध शहरांत फिरत आहेत. ‘हा संपूर्ण महिना देशभरात फिरणं आणि लोकांचं खूप प्रेम मिळवण्यात जात आहे. देवाचा आशीर्वाद आमच्या पाठिशी आहेच पण आईला वाटतंय की आम्हाला देवाच्या संरक्षणाचीही गरज आहे. त्यामुळे आमच्या सर्वांच्या कल्याणासाठी त्यांनी ही पूजा केली आहे,’ अशी पोस्ट विजयने लिहिली आहे.
बुधवारी अनन्या पांडेनंही विजयच्या घरातील फोटो शेअर केले होते. फोटो शेअर करताना अनन्याने कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘विजयच्या अम्माकडून आशीर्वाद मिळाला. लायगरसाठी हैदराबाद इथल्या त्यांच्या घरी पूजा करण्यात आली. मी खूप कृतज्ञ आहे. धन्यवाद काकू.’ विजय आणि अनन्याच्या या पोस्टवरून हे स्पष्ट झालं आहे की या दोघांचा साखरपुडा झाला नाही.
‘अर्जुन रेड्डी’ फेम विजय देवरकोंडा ‘लायगर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. त्याचसोबत अनन्या पांडेही या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करतेय. पुरी जगन्नाथ यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात बॉक्सिंग चॅम्पियन माईक टायसनदेखील पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे. विजय देवरकोंडाने ‘लायगर’साठी थायलंडमध्ये मिश्र मार्शल आर्ट्सचं प्रशिक्षण घेतल्याची माहिती आहे. हा चित्रपट संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे. तो तेलुगू आणि हिंदीमध्ये एकाच वेळी शूट करण्यात आला आहे.