‘तेरी दिवानी’, ‘सैंया’ आणि ‘अल्लाह के बंदे’ यांसारखी क्षणात ठेका धरायला लावणारी, लोकप्रिय गाणी गाणारे बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांचा आज म्हणजेच 7 जुलै रोजी 49 वा वाढदिवस आहे. उत्तर प्रदेशमधील मेरठ येथे 7 जुलै, 1973 साली त्यांचा जन्म झाला. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांवर कैलाश खेर (Kailash Kher) यांच्या आवाजाने जादू केली आहे. सध्याच्या काळात बॉलिवूडमधील दिग्गज गायकांपैकी (Singer) एक असलेल्या कैलाश खेर यांचा जीवनप्रवास फार सोपा नव्हता. वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी त्यांनी घर सोडले होते. लहानपणापासूनच कैलाश खेर यांना गायनाची आवड होती, त्याच कारणास्तव त्यांनी घर सोडले. कैलाश खेर यांना 2017 साली ‘पद्मश्री’ (Padmashri) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
कैलाश खेर यांच्या गायनाचे अनेक चाहते आहेत. त्यांच्या सुमधुर आवाजातील गाणी सर्वांनाच वेड लावतात. मात्र याच संगीतासाठी त्यांनी वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी त्यांचं राहतं घर सोडलं होतं, हे बऱ्याच जणांना माहीत नसेल. स्वत:च्या गाण्याचा, संगीताचा विकास व्हावा, यासाठी त्यांनी गुरूच्या शोधात हे पाऊल उचलले. घर सोडल्यावर त्यांनी गाणं शिकवण्यासही सुरूवात केली होती. त्याबद्दल त्यांना 150 रुपयेही मिळायचे. मात्र ते तेवढ्यावरच संतुष्ट नव्हते
1999 साली कैलाश खेर यांनी एका फॅमिली फ्रेंडसोबत हँडिक्राफ्टचा बिझनेस केला होता. मात्र त्यांना त्यात फारसे यश मिळाले नाही. तो बिझनेस काही काळ चालला खरा, पण त्यात फारसा नफा न होता तोटाच सहन करावा लागला. या अपयशामुळे कैलाश खेर डिप्रेशनमध्ये गेले होते, एवढेच नव्हे तर त्यांनी आपले जीवन संपवण्याचा निर्णयही घेतला होता. बराच काळ डिप्रेशनमध्ये असलेल्या खेर यांच्या मनात आत्महत्येचे विचार येत होते.
कैलाश खेर यांनी 22 भाषांमध्ये 1500 हून अधिक गाणी गायली आहेत. ‘तेरी दिवानी’, ‘सैंया’ आणि ‘अल्ला के बंदे’ या गाण्यांनी त्यांनी रसिकांच्या हृदयावर राज्य केले. मुलांना संगीत शिकवल्यानंतर व हँडिक्राफ्टच्या बिझनेसनंतर आपण एक चांगला गायक बनू शकू, असा विश्वास खेर यांना वाटला. 2001 साली ते दिल्लीहून मुंबईत आले. सुरूवातीच्या काळात हातात जास्त पैसे नसल्याने ने चाळीतही राहिले. कामाच्या शोधात ते वणवण भटकत होते. ‘अल्ला के बंदे’ या गाण्याने त्यांना खरी ओळख मिळवून दिली. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. आत्तापर्यंत त्यांनी बॉलिवूडमधील अनेक हिट गाणी गायली आहेत.
अनेक हिट गाण्यांमुळे प्रसिद्ध झालेल्या कैलाश खेर यांचे नाव ‘मीटू’ मूव्हमेंटमध्ये आल्याने मोठी खळबळ उडाली होती. फोटो जर्नलिस्ट नताशा हेमरजानी यांनी त्यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. 2016 साली नताशा त्यांच्या एका सहकाऱ्यासह कैलाश खेर यांच्या घरी इंटरव्ह्यूसाठी गेली होती. तेव्हा ते जवळ येऊन बसले व त्यांनी माझ्याशी गैरवर्तन केले, असा आरोप नताशाने केला होता. या आरोपानंतर मोठी खळबळ उडाली होती. कैलाश खेर यांचे अनेक शो रद्द झाले. बराच काळ ते बॉलिवूडपासूनही दूर राहिले होते.