प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्मांचं (Nupur Sharma) समर्थन केल्याने शिवणकाम व्यावसायिकाची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार राजस्थानच्या उदयपूरमध्ये (Udaipur) घडला. कन्हैय्यालाल असं या व्यावसायिकाचं नाव असून हत्येप्रकरणी मोहम्मद आणि रियाझ अशा दोघांना अटक करण्यात आली आहे. हल्लेखोरांनी कन्हैय्यालाल यांच्या दुकानात घुसून तलवारीने वार केले आणि या हल्ल्याचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट केला. या घटनेनंतर उदयपूरमध्ये तणाव निर्माण झाला असून या हत्येच्या निषेधार्थ स्थानिकांनी आंदोलन सुरू केलं आहे. या घटनेबाबत सर्वच स्तरांतून तीव्र संताप व्यक्त केला जात असून बॉलिवूडमधील (Bollywood) अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे.
‘द काश्मीर फाईल्स’चे दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री हे त्यांच्या बेधडक वक्तव्यांसाठीही ओळखले जातात. उदयपूर घटनेवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘एक सच्चा हिंदू बनणं आणि हिंदू-स्थानमध्ये जगणं अशक्य होत आहे. जगण्यासाठी एकतर शहरी नक्षल बना किंवा गायब व्हा किंवा मारले जा. रालिव, गालिव, चालिव’, असं ट्विट त्यांनी केलं.
It’s becoming impossible to be a Truthful Hindu and survive in Hindu-sthan.
To survive either become an #UrbanNaxals or become anonymous. Or be dead.
Raliv, Galiv, Chaliv. #KanhaiyaLal #Udaipur pic.twitter.com/4Es8E9zmna
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) June 28, 2022
बॉलिवूडचे दिग्गज कलाकार अनुपम खेर यांनीही या हत्येबद्दल संताप व्यक्त केला. या हत्येबद्दल त्यांनी आपली नाराजी तीन शब्दांत व्यक्त केली. “भयभीत… दुःखी… नाराज,” असं ट्विट त्यांनी केलं. त्यांच्या या ट्विटवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनुपम खेर यांचं ट्विट रिट्विट करत युजर्सनी दोन्ही आरोपींना लवकरात लवकर कायदेशीर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
Horrified… sad…. ANGRY… !#KanhaiyaLal
— Anupam Kher (@AnupamPKher) June 28, 2022
या घटनेवर अभिनेत्री कंगना रनौतही भडकली. तिने इन्स्टाग्रामवर स्टोरीच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला. ‘नूपूर शर्माला पाठिंबा दिल्याने या व्यक्तीला मारण्यात आलं. मारेकरी जबरदस्तीने त्यांच्या दुकानात घुसले आणि घोषणाबाजी करू लागले. हे सर्व देवाच्या नावानं झालं. हत्येनंतर दोघांनी अशा पोज दिल्या आणि व्हिडिओही बनवले. मी हे व्हिडिओ पाहण्याचे धाडसही करू शकत नाही. मी सुन्न झालेय’, असं तिने लिहिलंय.
कन्हैय्यालाल तेली असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव असून त्यांचे उदयपूरमधील धनमंडी इथं कपडे शिवण्याचं दुकान आहे. मंगळवारी दुपारी दुचाकीवरून दोघं जण आले आणि कापड मोजमापाच्या बहाण्याने त्यांनी दुकानात प्रवेश केला. दुकानात आल्यावर त्यांनी कन्हैय्यालालवर सपासप वार केले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. एका हल्लेखोराचं नाव रियाज असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून त्याने वार केले आणि दुसऱ्या तरुणाने मोबाइलवर या घटनेचा व्हिडीओ शूट केला, असं पोलिसांनी सांगितलं.