AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kiccha Sudeep: “तिसऱ्या व्यक्तीमुळे अजय आणि माझ्यात वाद”; हिंदी भाषेवरून किच्चा सुदीपचं स्पष्टीकरण

एप्रिलमध्ये सुदीपने एका कार्यक्रमात हिंदी ही ‘भारताची राष्ट्रभाषा राहिली नाही’ असं म्हटल्यानंतर अजयने ट्विटरवर त्याला टॅग केलं आणि त्याच्या विधानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हिंदीत एक पोस्ट लिहिली.

Kiccha Sudeep: तिसऱ्या व्यक्तीमुळे अजय आणि माझ्यात वाद; हिंदी भाषेवरून किच्चा सुदीपचं स्पष्टीकरण
Ajay Devgn and Kiccha SudeepImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jul 20, 2022 | 10:48 AM

काही महिन्यांपूर्वी कन्नड अभिनेता किच्चा सुदीप (Kiccha Sudeep) आणि बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) यांच्यामध्ये सोशल मीडियावर हिंदी (Hindi) आणि तिला राष्ट्रभाषा म्हणण्यावरून वाद झाला. एप्रिलमध्ये सुदीपने एका कार्यक्रमात हिंदी ही ‘भारताची राष्ट्रभाषा राहिली नाही’ असं म्हटल्यानंतर अजयने ट्विटरवर त्याला टॅग केलं आणि त्याच्या विधानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हिंदीत एक पोस्ट लिहिली. त्यामुळे ट्विटरवर दोन्ही कलाकारांमध्ये शाब्दिक वाद झाले. आता ‘हिंदुस्तान टाईम्स’शी बोलताना सुदीपने हे स्पष्ट केलं की आता अजयसोबत त्याचा कोणताही वाद नाही. यावेळी सुदीपने असंही म्हटलं की ट्विट करून वाद घालण्याची मूळ अजयची कल्पना नसावी. तीन महिन्यांपूर्वी ट्विटरवर झालेल्या भांडणानंतर तो आणि अजय देवगण आता ‘मित्र’ आहेत का असा प्रश्न विचारल्यावर सुदीप म्हणाला, “अजय देवगण एक सज्जन व्यक्ती आहे. मी तुम्हाला 100 टक्के खात्रीने हे सांगू शकतो की तिथे छोटासा चुकीचा अर्थ लावला गेला. त्याने माझ्या संदर्भात ट्विट केलं होतं, पण तो इतका साधा माणूस आहे की त्याने रिट्विट करून म्हटलं की मला माझं उत्तर मिळालं सुदीप, ते स्पष्ट केल्याबद्दल धन्यवाद.”

“यामागे निश्चितपणे तिसऱ्या व्यक्तीची कल्पना असेल”

अजयने सुदीपला उद्देशून केलेलं पहिलं ट्विट हिंदीत होतं, जे देवनागरी लिपीत लिहिलेलं होतं, तर सुदीपने त्याचं उत्तर इंग्रजीत दिलं होतं. किच्चा सुदीपने असंही म्हटलं की त्याने कन्नडमध्ये उत्तर देणं निवडलं असतं, पण त्याचा अर्थ अजयला समजला नसता. या वादानंतर सुदीपला काही चाहत्यांचा आणि सेलिब्रिटींचाही पाठिंबा मिळाला. या वादाबद्दल सुदीप पुढे म्हणाला, “मला खात्री आहे की माझ्या ओळखीचा माणूस कधीही हिंदीत ट्विट करणार नाही. यामागे निश्चितपणे तिसऱ्या व्यक्तीची कल्पना असेल. मला ते जाणून घ्यायचं नाही किंवा त्यावर निष्कर्ष काढायचा नाही.”

“हिंदी आमचीही भाषा”

अनेकांनी सुदीपवरही टीका केली होती आणि त्याचं विधान ‘हिंदीविरोधी’ असल्याचं म्हटलं होतं. मात्र हे खरं नाही असं सुदीप म्हणाला. तो म्हणाला की त्याला हिंदी भाषा आवडते आणि ती भाषा जितकी मूळ हिंदी भाषिकांची आहे तितकीच त्याचीही आहे. “हिंदी आमचीही आहे. ही एक भाषा आहे जी विशिष्ट धर्म किंवा समुदायाशी संबंधित नाही. ही एक सामान्य भाषा आहे जी आपण भारतात एकमेकांशी बोलण्यासाठी वापरतो. ही एकमेकांना जोडणारी भाषा आहे आणि आम्हाला तिचा अभिमान आहे”, असं त्याने स्पष्ट केलं.

हे सुद्धा वाचा

“शाळेत शिकवण्यापूर्वी बॉलिवूडने हिंदी शिकवलं”

“दक्षिणेत आमच्या शाळेत दुसरी भाषा किंवा तिसरी भाषा निवडण्यापूर्वीच आम्ही सर्वजण हिंदी शिकलो होतो. याचं श्रेय मी बॉलिवूडला देईन. आमचे दोन शिक्षक होते – किशोर कुमारजी आणि अमितजी (अमिताभ बच्चन). या दोन लोकांमुळे आम्ही शाळेत जाण्याआधीच हिंदी खूप शिकलो. त्यांची गाणी आणि मिस्टर बच्चन यांचे संवाद समजून घेण्यासाठी आम्हाला ते शिकावंच लागलं. तेव्हापासून आम्हाला हिंदीची आवड आहे,” असं तो पुढे म्हणाला.

“हिंदी जेवढी तुमची तेवढीच आमची”

अजयसोबत झालेल्या वादातून गैरसमज झाल्याचं म्हणत सुदीपने हिंदी भाषेबद्दल त्याचे विचार मांडले. “माझा हिंदीशी वाद नाही. माझा साधा मुद्दा असा होता की संपूर्ण भारताचा अर्थ नेहमीच हिंदी नसावा. मराठी, कन्नड, तेलुगू, पंजाबी, तमिळ चित्रपटही आता संपूर्ण भारतात प्रदर्शित होत आहेत. मला हेच म्हणायचं होतं. ती आपली राष्ट्रभाषा आहे, अशी चर्चा त्यावेळी होती. पण ती नाही आणि आम्हाला ती अजूनही आवडते. तो तिथून येत असेल पण ही भाषा आमचीही आहे. ती जेवढी तुमची आहे तेवढीच आमचीही आहे,” असं म्हणत त्याने वादावर पडदा टाकला.

कन्नड चित्रपटसृष्टीतील यशाव्यतिरिक्त सुदीपने रण, रक्त चरित्र आणि दबंग 3 सारख्या हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. त्याचा आगामी कन्नड चित्रपट ‘विक्रांत रोना’ हा हिंदी तसंच तमिळ, तेलुगू आणि मल्याळममध्ये देखील प्रदर्शित होत आहे. जॅकलिन फर्नांडिसचीही भूमिका असलेला हा चित्रपट येत्या 28 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.