बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ (Laal Singh Chaddha) आणि बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमारचा ‘रक्षा बंधन’ (Raksha Bandhan) हा चित्रपट येत्या 11 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. दोन्ही चित्रपट प्रदर्शनापूर्वीच चर्चेत आले आहेत आणि सोशल मीडियावर दोन्ही चित्रपटांबद्दल चर्चा होत आहे. गेल्या काही दिवसांपासून आमिरच्या लाल सिंग चड्ढा या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची जोरदार मागणी होत होती. मात्र आता ॲडव्हान्स बुकिंगचे (Advance Booking) आकडे समोर आल्याने बहिष्कार टाकण्याच्या मागणीमुळे चित्रपटाच्या व्यवसायावर फारसा फरक पडेल असं दिसून येत नाही.
आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’बद्दल बोलायचं झालं तर त्याची ॲडव्हान्स बुकिंग चांगलीच सुरू आहे. ॲडव्हान्स बुकिंगद्वारे हा चित्रपट जवळपास 8 कोटी रुपयांची कमाई करेल, असा अंदाज बॉक्स ऑफिस इंडियाने वर्तवला आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंग सुरू आहे. परंतु राज्यातील प्रेक्षकांकडून ॲडव्हान्स बुकिंगला आतापर्यंत फारसा प्रतिसाद मिळाला नाही.
11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणाऱ्या अक्षय कुमारच्या ‘रक्षा बंधन’बद्दल बोलायचं झालं तर, त्याची ॲडव्हान्स बुकिंग काही विशेष झाली नाही. ॲडव्हान्स बुकिंगद्वारे हा चित्रपट जवळपास 3 कोटींची कमाई करू शकेल, असा अंदाज आहे. तरी हे ॲडव्हान्स बुकिंगचे आकडे अक्षय कुमारच्या ‘बच्चन पांडे’ आणि ‘सम्राट पृथ्वीराज’ या मागील दोन चित्रपटांपेक्षा खूपच चांगले आहेत. ॲडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत हा चित्रपट ‘लाल सिंग चड्ढा’पेक्षा खूपच मागे आहे.
बॉलिवूडमध्ये बऱ्याच काळानंतर दोन मोठे चित्रपट एकत्र प्रदर्शित होत आहेत. आता चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर त्यांचा व्यवसाय कसा होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. आमिर खान, करीना कपूर, मोना सिंग आणि नाग चैतन्य यांच्या लाल सिंग चड्ढामध्ये मुख्य भूमिका आहेत. तर आनंद एल राय दिग्दर्शित रक्षाबंधन या चित्रपटात अक्षय कुमार व्यतिरिक्त भूमी पेडणेकर, सादिया खतीब आणि सीमा पाहवा हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.