अभिनेत्री आणि मॉडेल मंदाना करिमी (Mandana Karimi) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी मंदाना ही कंगना रनौतच्या ‘लॉक अप’ (Lock Upp) या शोमध्ये झळकली होती. या शोमध्ये तिने तिच्या खासगी आयुष्याविषयी काही धक्कादायक खुलासे केले होते. आता मंदाना सध्या युरोपमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतेय. तिथले फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर सतत पोस्ट करतेय. अशाच एका व्हिडीओवरून तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केलंय. या व्हिडीओमध्ये मंदानाने हिजाब परिधान करून ‘ट्वर्किंग’ (Twerking- डान्सचा एक प्रकार) केल्याने तिच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे. इस्तांबूलमध्ये शॉपिंग करताना हिजाबमध्ये तिने हा व्हिडीओ शूट केला आहे. या ट्रोलिंगवर आता मंदानाने उत्तर दिलं आहे.
“या पडद्यामागील व्हिडीओप्रमाणेच हिजाब घालून शूट करणं सोपं असतं तर बरं झालं असतं”, असं लिहित मंदानाने ट्वर्किंगचा व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यावरून तिच्यावर टीका झाली. ‘हिजाबचा अपमान करू नकोस’, असं एकाने म्हटलं. तर ‘असा व्हिडीओ करण्याआधी किमान एकदा तरी विचार कर’ असं दुसऱ्याने लिहिलं. ‘लाज वाटली पाहिजे तुला’ अशा शब्दांत आणखी एका युजरने सुनावलं. आपल्या व्हिडीओवर आलेल्या या नकारात्मक प्रतिक्रियांना उत्तर देताना मंदानाने लिहिलं, ‘.. आणि अर्थात मी माझ्या बुरखा रिलवरील कमेंट्स वाचतेय. बापरे लोक किती वेडे आहेत, हे जग वेडं आहे. आता पुरे झालं, मला (युनिकॉर्न) व्हायचं आहे.’
इराणी मॉडेल आणि अभिनेत्री असलेल्या मंदानाने ‘भाग जॉनी’, ‘क्या कूल है हम 3’, ‘मै और चार्ल्स’ यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलंय. मात्र ‘बिग बॉस’ आणि ‘लॉक अप’ या शोमुळे तिला अधिक प्रसिद्धी मिळाली. मंदानाने शाहरुख खान, करीना कपूर खान यांसारख्या लोकप्रिय कलाकारांसोबतही काम केलंय.
मंदाना करीमीने जानेवारी 2017 मध्ये गौरव गुप्तासोबत लग्न केलं. जुलै 2017 मध्ये तिने त्याच्या आणि त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला. पण ऑगस्ट 2017 मध्ये तिने ही तक्रार मागे घेतली. ‘लॉक अप’ या शोमध्ये मंदानाने पूर्व पतीविषयी धक्कादायक खुलासा केला होता. मॉडेल अझ्मा फलाहशी बोलताना ती म्हणाली, “माझं वयाच्या 27व्या वर्षी लग्न झालं. आम्ही अडीच वर्षे एकमेकांना डेट केलं आणि त्यानंतर लग्न केलं. लग्नानंतर घडलेल्या काही घटनांमुळे आम्ही काही काळ वेगळे राहू लागलो. गेल्या वर्षी मी घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया पार पडली. जेव्हा आम्ही वेगळे राहत होतो, त्या चार वर्षांच्या काळात त्याने मी ओळखत असलेल्या प्रत्येकीशी शरीरसंबंध ठेवले होते.”