आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या कलाकारांमध्ये नवाजुद्दीन सिद्दिकीचं (Nawazuddin Siddiqui) नाव आवर्जून घेतलं जातं. ब्लॅक फ्रायडे, कहानी, गँग्स ऑफ वासेपूर, बदलापूर, फोटोग्राफ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार अभिनय केलं. उत्तर प्रदेशातील बुढाना या छोट्याशा गावातून आलेल्या नवाजुद्दीनने सुरुवातीला इंडस्ट्रीत बराच संघर्ष केला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने सांगितलं की, काही वर्षांपूर्वी जेव्हा तो त्याच्या गावी राहत होता, तेव्हा एका मुलीने टीव्हीसाठी त्याला नाकारलं होतं. तेव्हा मी एकेदिवशी टीव्हीवर येऊनच दाखवेन, असा निश्चय नवाजुद्दीनने केला होता. ‘ब्रुट इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत नवाजने हा किस्सा सांगितला. (Bollywood Actor)
नवाजने सांगितलं, “खरंतर जेव्हा आमच्या गावात टीव्ही आला, तेव्हा ती कृषी दर्शन पाहायला जायची. कधी कधी ती जात असताना, मी तिला माझ्याशी बोलायला सांगायचो. पण ती माझ्याशी बोलली नाही, कारण तिला कृषी दर्शन पहायला जायचं होतं. म्हणून मी तिला म्हणालो, ‘एक दिन तुझे मै टीव्ही पे आ कर दिखाऊंगा’ (एक दिवस मी टीव्हीवर येऊन दाखवेन)”
“मुंबईमध्ये मी पहिल्यांदा एक मालिका केली तेव्हा मला आठवलं की मी एका मुलीला वचन दिलं होतं. म्हणून मी माझ्या गावातील मित्राला फोन केला आणि त्या मुलीशी बोलण्यास सांगितलं. एक दिवस मी टीव्हीवर येईन असं तिला मी सांगितलं होतं. उद्या माझा कार्यक्रम टीव्हीवर आहे हे तिला सांग असं मी मित्राला म्हणालो. त्यावर माझा मित्र म्हणाला, “भाऊ, तिचं लग्न झालंय आणि तिला 5-6 मुलं आहेत. ज्या व्यक्तीशी तिचं लग्न झालंय तो तिला केवळ टीव्हीच पाहू देत नाही तर घराबाहेरही पडू देत नाही,” असं नवाजने पुढे सांगितलं.
नवाजुद्दीन लवकरच ‘हिरोपंती 2’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये टायगर श्रॉफसोबत तो स्क्रीन शेअर करणार आहे. “मी माझ्या प्रेक्षकांना कधीच गृहित धरत नाही. छोट्यातल्या छोट्या भूमिकेतून काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो”, असं नवाजुद्दीने ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. त्याची ‘सेक्रेड गेम्स’ ही वेब सीरिजसुद्धा प्रचंड गाजली.