Karthikeya 2: बॉलिवूडवर पुन्हा एकदा साऊथचा चित्रपट भारी; ‘लाल सिंग चड्ढा’, ‘दोबारा’ला मागे टाकत ‘कार्तिकेय 2’ची दमदार कमाई
गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूड विरुद्ध दाक्षिणात्य चित्रपटांवरून चांगलीच चर्चा रंगली होती. बॉलिवूड चित्रपटांची जादू फिकी पडत असून दाक्षिणात्य चित्रपटांच्या हिंदी व्हर्जनलाही दमदार प्रतिसाद मिळत असल्याचं पहायला मिळालं.
आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ (Laal Singh Chaddha) आणि तापसी पन्नूचा ‘दोबारा’ (Dobaaraa) या चित्रपटांना मागे टाकत सध्या तेलुगू चित्रपट ‘कार्तिकेय 2’ (Karthikeya 2) बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करतोय. त्यामुळे पुन्हा एकदा बॉलिवूड चित्रपटांवर दाक्षिणात्य चित्रपट भारी पडला आहे. कार्तिकेय 2 च्या हिंदी डबिंग व्हर्जनने दुसऱ्या आठवड्यात दोन कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने कमाईचे आकडे ट्विटरवर पोस्ट केले आहेत. शनिवारी लाल सिंग चड्ढा आणि रक्षाबंधन या चित्रपटांपेक्षा कार्तिकेय 2 च्या हिंदी व्हर्जनने चांगली कमाई केली. त्यामुळे आतापर्यंत या तेलुगू चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनची कमाई ही 8.21 कोटी रुपये इतकी झाली आहे.
निखिलची मुख्य भूमिका असलेल्या कार्तिकेय 2 या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात जगभरात 48 कोटींचा गल्ला जमवला. चंदू मोंडेटी यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात निखिलसोबत अनुपमा परमेश्वरमने मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात तेलंगणामुळे 29.55 कोटी रुपये आणि आंध्रप्रदेशमध्ये 18.69 कोटी रुपयांची कमाई केली. गुरुवारी कार्तिकेय 2 च्या हिंदी व्हर्जनने 1.64 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. तर याच दिवशी लाल सिंग चड्ढाची 1.30 कोटी रुपये इतकी कमाई झाली. तर रक्षाबंधनने 1 कोटी रुपये कमावले.
#Karthikeya2 #Hindi emerges first choice of moviegoers… Collects more than #LSC and #RB *yesterday* [Fri]… Mass pockets/single screens are super-strong… Will continue to dominate over the weekend… [Week 2] Fri 2.46 cr. Total: ₹ 8.21 cr. #India biz. HINDI version. pic.twitter.com/E6cKGuG6b8
— taran adarsh (@taran_adarsh) August 20, 2022
अक्षय कुमारच्या रक्षाबंधन या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 28 कोटींची कमाई केली. आनंद एल राय दिग्दर्शित हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. याच दिवशी आमिरचा लाल सिंग चड्ढा हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर मोठा वीकेंड येऊनसुद्धा त्याचा फायदा या दोन्ही चित्रपटांना झाला नाही. तर दुसरीकडे तापसी पन्नूच्या दोबारा या चित्रपटाने पहिल्या दिवशी फक्त 72 लाखांची कमाई केली.
गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूड विरुद्ध दाक्षिणात्य चित्रपटांवरून चांगलीच चर्चा रंगली होती. बॉलिवूड चित्रपटांची जादू फिकी पडत असून दाक्षिणात्य चित्रपटांच्या हिंदी व्हर्जनलाही दमदार प्रतिसाद मिळत असल्याचं पहायला मिळालं. या वादावर अनेकांनी आपली मतंसुद्धा मांडली होती. आता पुन्हा एकदा बॉलिवूडमधल्या मोठ्या कलाकारांच्या चित्रपटांसमोर तेलुगू चित्रपट दमदार कामगिरी करत असल्याचं पहायला मिळत आहे.