घनदाट केस गायब झाले अन् टक्कल पडलं… विल स्मिथच्या पत्नीला नेमका कोणता आजार आहे? ज्यावरून ऑस्करमध्ये झाला वाद
Alopecia Areata : विल स्मिथच्या कृतीबद्दल आणि त्याच्या पत्नीच्या आजाराविषयी खूप चर्चा झाली. तिला अॅलोपेसिया हा आजार आहे. हा आजार नेमका काय आहे? या विषयी जाणून घेऊयात...
मुंबई : जगभरात अत्यंत प्रतिष्ठित मानला जाणारा ऑस्कर (Oscar 2022) पुरस्कार सोहळा तब्बल तीन वर्षांनंतर लॉस एंजिलिसमध्ये पार पडला. या पुरस्कार सोहळ्यादरम्यान अभिनेता विल स्मिथची (Will Smith) सूत्रसंचालक क्रिस रॉक (Chris Rock) याच्याशी बाचाबाची झाली. क्रिस रॉकने विलच्या पत्नीवर कमेंट केली. त्यामुळे भडकलेल्या विलने मंचावर जाऊन क्रिस रॉकच्या कानशिलात लगावली. G.I. Jane या चित्रपटावरून क्रिस रॉकने विल स्मिथची पत्नी जेडा पिंकेट स्मिथची (Jada Pinkett Smith ) खिल्ली उडवली. जेडाच्या टकलावरून रॉकने मस्करी केली. जेडाला टक्कल असल्यामुळेच तिला चित्रपटातील भूमिका मिळाली, असं तो म्हणाला. पत्नीची केलेली ही मस्करी विस स्मिथला अजिबात आवडली नाही. तो भर पुरस्कार सोहळ्यात मंचावर गेला आणि क्रिसच्या कानशिलात लगावली. या सगळ्या प्रकारानंतर विल स्मिथच्या कृतीबद्दल आणि त्याच्या पत्नीच्या आजाराविषयी खूप चर्चा झाली. तिला अॅलोपेसिया (Alopecia Areata) हा आजार आहे. हा आजार नेमका काय आहे? या विषयी जाणून घेऊयात…
अभिनेता विल स्मिथची पत्नी जेडा पिंकेटला अॅलोपेसिया नावाचा आजार आहे. या आजारामुळे तिचे केस गळतात. 2018 मध्ये पहिल्यांदा ती याविषयी बोलली होती. तिच्या या आजाराविषयी अनेकांना प्रश्न आहेत.
‘अॅलोपेसिया एरिटा’ हा आजार नेमका काय आहे?
अॅलोपेसिया एरिटा हा आजार तुमच्या केसांवर सर्वाधिक परिणाम करतो. या आजारामुळे केस गळण्यास सुरूवात होते. या आजारात केसांच्या मुळांवर सर्वप्रथम हल्ला होतो.यामुळे केस झपाट्याने तुटतात आणि त्यामुळे टक्कल पडू लागतं. काहींच्या भुवयांवरचेही केस गळू लागतात. तसंच काहींच्या पापण्या आणि चेहऱ्यावरच्या केसांच्या बाबतीतही ही समस्या जाणवते.
आपल्याला अॅलोपेसिया एरिटा आहे का हे कसे ओळखावं?
केस गळणं ही एक सामान्य समस्या आहे. त्यामुळे सुरूवातीला या आजाराच्या रुग्णांना याची गंभीरता लक्षात येत नाही. पण नंतर-नंतर ही केसगळती अधिक गंभीर रूप धारण करते आणि मग टक्कल पडू लागतं. केस गळलेल्या ठिकाणी खाज सुटते आणि जळजळ सुरू होते. उपचारानंतर हा आजार बरा होऊ शकतो. पण काही काळानंतर हा आजार पुन्हा उद्भवू शकतो.