Ram Setu: ‘राम सेतू’ने अखेर अक्षयला बुडण्यापासून वाचवलं; मिळाला प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद!
तीन फ्लॉप चित्रपटांनंतर 'राम सेतू'ने अक्षयला तारलं; जाणून घ्या कमाई..
मुंबई- या वर्षभरात आतापर्यंत तीन फ्लॉप चित्रपटांनंतर अखेर ‘राम सेतू’ने अभिनेता अक्षय कुमारला तारलं आहे. राम सेतू हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतोय. त्यामुळे अक्षयला दिलासा मिळाला आहे. 25 ऑक्टोबर रोजी दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित झाला. विशेष म्हणजे याच दिवशी अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्राचा ‘थँक गॉड’सुद्धा प्रदर्शित झाला. प्रदर्शनापूर्वी चित्रपटावरून झालेला वाद आणि अजय देवगणच्या चित्रपटाशी टक्कर यांमुळे ‘राम सेतू’च्या कमाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला होता. मात्र प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळत असल्याने चित्रपटाची चांगली कमाई होत आहे.
प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच 27 ऑक्टोबर रोजी या चित्रपटाने 8.75 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांत राम सेतूच्या कमाईचा आकडा हा 35.40 कोटींच्या घरात पोहोचला आहे. पहिला वीकेंड या चित्रपटासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शनिवारी आणि रविवारी कमाईच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता आहे.
#RamSetu is holding well in mass pockets, which is driving its biz… But biz at multiplexes/urban centres – which contribute a large chunk – is lacklustre… Weekend biz [Fri to Sun] will be the decider… Tue 15.25 cr, Wed 11.40 cr, Thu 8.75 cr. Total: ₹ 35.40 cr. #India biz. pic.twitter.com/CsezTGsBK2
— taran adarsh (@taran_adarsh) October 28, 2022
राम सेतूच्या कमाईचा हा आकडा अक्षय कुमारसाठी दिलासादायक आहे. ‘बेल बॉटम’ (19 ऑगस्ट 2021), बच्चन पांडे (18 मार्च 2022), सम्राट पृथ्वीराज (3 जून 2022) आणि रक्षाबंधन (11 ऑगस्ट 2022) हे त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कमाई करू शकले नव्हते.
गेल्या वर्षभराचा कालावधी पाहता ‘सूर्यवंशी’ हा अक्षयचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. त्यानंतर आता ‘राम सेतू’ची कमाई चांगली होताना दिसतेय.
अभिषेक शर्मा दिग्दर्शित राम सेतू या चित्रपटात अक्षयसोबत जॅकलिन फर्नांडिस आणि नुशरत भरूचा यांच्या मुख्य भूमिका आहेत. यामध्ये अक्षयने आर्यन कुलश्रेष्ठ नावाच्या एका पुरातत्त्व विशेषज्ञाची भूमिका साकारली आहे.