Salman Khan: “बॉलिवूड चित्रपट दक्षिणेत का चालत नाही?”; सलमानने सांगितलं कारण
अभिनेता सलमान खान (Salman Khan) लवकरच तेलुगू मेगास्टार चिरंजीवीसोबत (Chiranjeevi) काम करणार आहे. 'गॉडफादर' असं या चित्रपटाचं नाव आहे. यावर बोलताना सलमान बॉलिवूड आणि टॉलिवूड (Tollywood) चित्रपटांविषयी व्यक्त झाला.
अभिनेता सलमान खान (Salman Khan) लवकरच तेलुगू मेगास्टार चिरंजीवीसोबत (Chiranjeevi) काम करणार आहे. ‘गॉडफादर’ असं या चित्रपटाचं नाव आहे. यावर बोलताना सलमान बॉलिवूड आणि टॉलिवूड (Tollywood) चित्रपटांविषयी व्यक्त झाला. “त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच छान होता. चिरू गारू यांना मी खूप आधीपासून ओळखतो. ते माझे चांगले मित्र आहेत. त्यांचा मुलगा रामचरणसुद्धा माझा चांगला मित्र आहे. RRR या चित्रपटात त्याने दमदार अभिनय केलं. त्याच्या वाढदिवसानिमित्त मी त्याला फोन करून शुभेच्छा दिल्या होत्या. पडद्यावरील त्याचं काम पाहून मला खूप बरं वाटतं. दाक्षिणात्य चित्रपट आपल्याकडे खूप चालतात, पण आपले चित्रपट तिकडे का इतके चालत नाही, असा मला प्रश्न पडतो”, असं सलमान यावेळी म्हणाला. IIFA अवॉर्ड्स 2022 निमित्त मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत तो बोलत होता. हा पुरस्कार सोहळा 20 आणि 21 मे रोजी अबू धाबीमध्ये पार पडणार आहे.
“दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा खूप मोठा फॅन फॉलोइंग”
“साऊथ इंडियन फिल्म इंडस्ट्रीचा ‘हिरो’ या संकल्पनेवर खूप विश्वास आहे. जेव्हा तुम्ही थिएटरमधून बाहेर पडता, तेव्हा ती भावना तुमच्या मनात राहिली पाहिजे. इथे एक-दोन लोक सोडले तर, अशा आधारावर कोणीच चित्रपट बनवत नाहीत. आपणसुद्धा लार्जर दॅन लाइफ हिरोइस्मवरील चित्रपट पुन्हा एकदा बनवायला सुरुवात केली पाहिजे. मीसुद्धा तेच करण्याचा प्रयत्न करतोय. चित्रपटातील हिरोची संकल्पना नेहमी कामी येते. कारण ती प्रेक्षकांना त्या कलाकाराशी जोडून ठेवते. सलिम-जावेद यांच्या वेळी आपल्याकडे अशी संकल्पना अंमलात आणली जात होती. पण दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी यात एक पाऊल पुढे आहे. तिथला फॅन फॉलोइंग हा प्रचंड आहे. तिथे विविध स्टाइलचे चित्रपट आहेत आणि ही चांगली गोष्ट आहे,” असं सलमान म्हणाला.
View this post on Instagram
“इथल्या लोकांना वाटतं भारत हा कफ परेडपासून अंधेरीपर्यंतच आहे”
बॉलिवूड आणि दक्षिणेकडच्या चित्रपटांची तुलना करताना सलमान पुढे म्हणाला, “जर तुम्ही दबंग सीरिज पाहिलीत, तर पवन कल्याण यांनी ती तेलुगूमध्ये बनवली आहे. वाँटेडसुद्धा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत बनवली गेली. अशा प्रकारचे चित्रपट आणखी बनवले गेले पाहिजेत. आता आम्ही कभी ईद कभी दिवाली या चित्रपटात तो प्रयत्न करणार आहोत. आपल्या चित्रपटांचे रिमेक दक्षिणेत केले पाहिजेत. तिथले लेखक खूपच मेहनती आहेत. अत्यंत सुंदर संकल्पनांवर आधारित ते चित्रपटाची कथा लिहितात. जरी एखादा चित्रपट छोटा आणि कमी बजेटचा असला तरी लोक थिएटरमध्ये जाऊन ते पाहतात. मला असं वाटतं, इथले लोक असा विचार करतात की भारत हा कफ परेडपासून अंधेरीपर्यंतच आहे. मला मात्र कफ परेड आणि अंधेरीनंतर हिंदुस्थानची खरी सुरुवात होते असं वाटते. वास्तविक हिंदुस्थान वांद्रे पूर्वमधील रेल्वे ट्रॅकच्या पुढे आहे. माझे चित्रपटही त्यांच्यासाठीच आहेत. ते एक चांगला संदेश घेऊन येतात. चित्रपट पाहिल्यानंतर लोकांमध्ये उत्साह संचारला पाहिजे.”
दाक्षिणात्य चित्रपट पहायला आवडत असून आतापर्यंत त्याला कुठल्याही दाक्षिणात्य चित्रपटाची ऑफर आली नाही, असंही त्याने यावेळी सांगितलं. तो म्हणाला, “जेव्हा ते माझ्याकडे येतात तेव्हा ते माझ्याकडे तामिळ किंवा तेलुगू चित्रपटासाठी येत नाहीत. ते माझ्याकडे हिंदीसाठी येतात.”
हेही वाचा:
Rimi Sen | ‘धूम’गर्ल रिमी सेनची फसवणूक, बिझनेसमनकडून 4.40 कोटींना चुना