अभिनेता आणि निर्माता सोहैल खानची (Sohail Khan) पूर्वाश्रमीची पत्नी सीमा खानने (Seema Khan) पहिल्यांदाच घटस्फोटाबाबत (Divorce) मौन सोडलं. तब्बल 24 वर्षांच्या संसारानंतर यावर्षी सोहैल आणि सीमाने घटस्फोटासाठी अर्ज केला. सीमा ही फॅशन डिझायनर असून नेटफ्लिक्सवरील ‘फॅब्युलस लाइव्स ऑफ बॉलिवूड वाइव्स’ या सीरिजमध्ये ती झळकली. या सीरिजमध्ये पहिल्यांदाच ती तिच्या खासगी आयुष्याबद्दल व्यक्त झाली. त्यानंतर आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सीमाने घटस्फोटाचा निर्णय का घेतला, याविषयी सांगितलं. 1998 मध्ये ‘प्यार किया तो डरना क्या’ या चित्रपटाच्या सेटवर सोहैल आणि सीमा पहिल्यांदा भेटले होते. शूटिंगदरम्यान दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि हळूहळू या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. या दोघांना निर्वाण आणि योहान ही दोन मुलं आहेत. घटस्फोटासाठी अर्ज करण्याआधील काही महिन्यांपासून सोहैल आणि सीमा वेगवेगळे राहत होते.
‘बॉलिवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत सीमा म्हणाली, “जर मी त्यात वाहवत गेले असते तर खोल अंधारात कुठेतरी हरवले असते. त्यामुळे मी दुसऱ्या बाजूला राहणं पसंत केलं. या निर्णयामुळेच मी आयुष्यात पुढे पाऊल टाकू शकतेय. माझ्या मुलांना, कुटुंबीयांना, माझ्या भावाला आणि बहिणीला मी आनंदी राहावं हेच हवं होतं. तुमची बहीण किंवा मुलगी जर दु:खात वाहून जात असेल, तर तुम्ही ते पाहू शकत नाही. तुम्ही सतत त्या व्यक्तीविषयी चिंतेत असता. आता मी माझ्या आयुष्याकडे संपूर्ण सकारात्मक दृष्टीकोनातून पाहतेय, हे त्यांनाही कळतंय. जी काही नकारात्मकता होती, ती मागे सोडून मी पुढे जातेय. मला काहीच फरक पडत नाही, असा विचार करण्यापर्यंतच्या टप्प्यापर्यंत मी पोहोचली होती.”
घटस्फोटाआधीच सीमाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ‘खान’ हे आडनाव काढून टाकलं होतं. सीमा किरण सजदेह असं नाव तिने लिहिलं. “अनेकदा वेळेसोबत तुमचे नातेसंबंध बिघडू लागतात आणि ते वेगवेगळ्या दिशेने जाऊ लागतात. मी याबद्दल दिलगिरी व्यक्त करत नाही कारण आम्ही आनंदी आहोत आणि माझी मुलं खूश आहेत. सोहैल आणि मी एकत्र खूश नाही पण आम्ही एक कुटुंब म्हणून राहतोय. आमच्यासाठी मुलांचा आनंद महत्त्वाच आहे,” असं ती नेटफ्लिक्सच्या शोमध्ये म्हणाली होती. सोहैल आणि सीमा यांचाही संसार मोडू नये म्हणून सलमानचे प्रयत्न केल्याचं समजतंय. मात्र घटस्फोट घेण्याबाबत हे दोघं ठाम आहेत.