Amjad Khan: मुलाच्या जन्मावेळी ‘गब्बर सिंग’कडे हॉस्पीटलच्या बिलाचेही नव्हते पैसे; ‘या’ कारणामुळे मानतात मुलाला नशिबवान
खुद्द शादाब खान यांनी एका मुलाखतीदरम्यान ही गोष्ट सांगितली होती. याच कारणामुळे अमजद खान हे आपल्या मुलाला भाग्यवान मानू लागले होते. या दिवसाची एक अतिशय हृदयस्पर्शी घटनादेखील आहे.

दिवंगत अभिनेते अमजद खान (Amjad Khan) यांनी बॉलिवूडमधील सर्वात भयंकर डाकू गब्बर सिंगची (Gabbar Singh) भूमिका साकारली. ‘शोले’ (Sholay) चित्रपटातील त्यांचे संवाद आजही खूप चर्चेत आहेत. या चित्रपटाशी निगडीत अमजद खान यांची खूप सुंदर आठवण आहे. त्यांनी ज्यादिवशी ‘शोले’ हा चित्रपट साइन केला त्याच दिवशी त्यांचा मुलगा शादाब खान यांचा जन्म झाला. खुद्द शादाब खान यांनी एका मुलाखतीदरम्यान ही गोष्ट सांगितली होती. याच कारणामुळे अमजद खान हे आपल्या मुलाला भाग्यवान मानू लागले होते. या दिवसाची एक अतिशय हृदयस्पर्शी घटनादेखील आहे.
हॉस्पिटलच्या बिलाचेही पैसे नव्हते
मुलगा शादाबच्या जन्माचा दिवस अमजद खान यांच्यासाठी दुहेरी आनंदाचा दिवस होता. एकीकडे ते पिता झाले, घरात चिमुकला पाहुणा आला होता आणि दुसरीकडे त्यांनी सुपरहिट चित्रपट साइन केला होता, ज्या चित्रपटाने त्यांची कारकीर्द चमकवली. पण यानंतरही ते त्यादिवशी उदास होते, थोडे असहाय्य होते. ते आपल्या पत्नीला तोंड दाखवू शकत नव्हते. कारण अमजद खान यांच्याकडे त्यादिवशी मुलाच्या जन्मानंतर हॉस्पिटलचं बिल जमा करण्यासाठीही पैसे नव्हते.
बिलाचे पैसे कुठून आले?
एका मुलाखतीदरम्यान शादाब खान यांनी वडिलांबद्दल अनेक गोष्टी शेअर केल्या होत्या. यावेळी त्यांनी सांगितलं होतं की, “माझे वडील मला लकी म्हणायचे, कारण माझा जन्म झाला त्याच दिवशी माझ्या वडिलांनी ‘शोले’ साइन केला होता. असं असूनही हॉस्पिटलचं बिल भरण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. माझी आई रडत होती. चित्रपट निर्माता आणि अभिनेते चेतन आनंद यांनी माझ्या वडिलांना एका कोपऱ्यात नेलं आणि त्यांना 400 रुपये दिले. तेव्हा वडिलांनी हॉस्पिटलचं बिल भरलं.”




सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक
‘शोले’ हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाची कथा सलीम-जावेद यांनी लिहिली होती. तर रमेश सिप्पी यांनी त्याचं दिग्दर्शन केलं होतं. ‘शोले’ हा क्लासिक आणि सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपटांपैकी एक मानला जातो. यामध्ये अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमा मालिनी, जया बच्चन यांसारखे त्यांच्या काळातील सुपरस्टार मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटात अमजद खान यांनी डाकू गब्बर सिंगची भूमिका साकारली होती.