Hariharan Birthday : दोनदा राष्ट्रीय पुरस्कार विजेते, पद्मश्री हरिहरन यांचा जीवनप्रवास…
Hariharan Birthday : आपल्या देशाला अनेक सुरेल गायकांची परंपरा आहे. त्यातलंच एक नाव म्हणजे हरिहरन... त्यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या विषयी जाणून घेऊयात...
मुंबई : आपल्या आवाजाच्या जोरावर लोकांच्या मनावर अधिराज्य करणारे गायक हरिहरन (Singer Hariharan) यांचा आज वाढदिवस (Hariharan Birthday)आहे. त्यानिमित्त त्यांच्याविषयी जाणून घेऊयात… हरिहरन यांचा जन्म 3 एप्रिल 1955 ला एका तमिळ कुटुंबात झाला. त्यांनी अगदी लहान वयापासूनच गायकीचे धडे घेतले. ते दिवसात 13 तास रियाज करायचे.हरिहरन यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरूवातीला काही मैफली केल्या. त्यानंतर मग त्यांनी टीव्हीवरच्या काही कार्यक्रमात सहभाग घेतला. ‘जुनून’ (Junun) या मालिकेच्या शीर्षक गीतामुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली आणि त्यानंतर त्यांचा टेलिव्हिजनवरचा सुरेल प्रवास सुरू झाला तो आज तागायत… त्यांनी आतापर्यंत 10 भाषांमध्ये 15 हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. हरिहरन यांनी मराठी, तेलगू, मल्याळम, कन्नड भाषेतील चित्रपटातील गाण्यांना आवाज दिला आहे. त्यांनी 1977 मध्ये ‘गमन’ या चित्रपटासाठी गाणं गायलं होतं. हरिहरन कायम आपल्या सगळ्या यशाचं श्रेय दिवंगत संगीत दिग्दर्शक जयदेव यांना देतात.
हरिहरन यांनी 1992 मध्ये तमिळ चित्रपटांमधून आपल्या करिअरला सुरुवात केली. मणिरत्नम यांच्या रोजा या चित्रपटात त्यांनी ए आर रहमान यांच्यासोबत काम केलं. या चित्रपटातील ‘थमिजा थामिझा’ हे गीत त्यांनी गायलं. ‘उइरे उइरे’ या गाण्यासाठी 1995 साली त्यांना तामिळनाडू सरकारकडून सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कारही मिळाला होता. एआर रहमान आणि हरिहरन यांनी खूप एकत्र काम केलंय. अनेक गाणी त्यांनी एकत्र केली आहेत. मुथू, मिनासरा कनावू, जीन्स, इंडियन, मुधळवन, ताल, रंगीला, इंदिरा, इरुवर या चित्रपटातील गाणी त्यांनी एकत्र निर्माण केली आहेत.
दोनदा राष्ट्रीय पुरस्कार
1998 मध्ये आलेल्या बॉर्डर या हिंदी चित्रपटातील ‘मेरे दुश्मन मेरे भाई’ या गाण्यासाठी त्यांना पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यानंतर त्यांनी एक मराठी गाणं गायलं ज्याला त्यांना दुसरा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. 2009 मध्ये आलेल्या जोगवा चित्रपटातील अजय अतुल यांचं संगीत असणारं ‘जीव रंगला’ हे गाणं त्यांनी गायलं जे आजही तितक्याच आवडीने ऐकलं जातं. या गाण्यासाठी हरिहरन यांना दुसऱ्यांदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. हरिहरन यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. 2004 मध्ये त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कारही देण्यात आला. हरिहरन यांच्या आवाजातील हनुमान चालिसाने तर सर्व रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. हे भक्तीगीत आता पर्यंत 2 अब्जहून अधिक लोकांनी यूट्यूबवर पाहिलं आहे. त्यांच्या या भक्तीगीताला विशेष प्रसिद्धी मिळाली. हे जगातलं सर्वाधिक पाहिलं गेलेलं भक्तीगीत आहे.
संबंधित बातम्या