Actors Who Were Arrested in 2024 : कुणावर बलात्काराचा, तर कुणावर हत्येचा आरोप; 2024 मध्ये ‘या’ अभिनेत्यांना झाली अटक
2024 हे वर्ष दक्षिण भारतीय सिनेसृष्टीसाठी चढ-उताराने भरलेलं होतं. अल्लू अर्जुन, कस्तुरी, बाला, सिद्धीक यांसारख्या प्रसिद्ध कलाकारांना अटकेचा सामना करावा लागला.
दाक्षिणात्य सिनेसृष्टीसाठी 2024 वर्ष काहीसं नरम गरम राहिलं आहे. या वर्षात साऊथच्या सिनेमांनी प्रचंड गल्ला कमावला. हिंदीलाही मागे टाकेल इतकं मोठं यश मिळवलं. त्यामुळे साऊथची वाहवा झाली. मात्र, अभिनेते, दिग्दर्शक आणि इतरांच्या अटकेमुळेही साऊथ सिनेमा बराच चर्चेत राहिला. खास करून मल्याळम सिनेसृष्टीसाठी 2024 हे वर्ष अत्यंत धक्कादायक राहिलं आहे. “हेमा समिती रिपोर्ट” आला आणि मल्याळम सिनेमातील कटू सत्य बाहेर आलं. मल्याळम सिनेसृष्टीत अभिनेत्रींच्या होणाऱ्या लैंगिक शोषणाचा पडदाच या समितीने फाडला. त्यामुळे अनेक प्रमुख व्यक्तींना अटक झाली. लैंगिक शोषणापासून हत्यापर्यंत अनेक घटनांमुळे या प्रसिद्ध कलाकारांनाही अटक झाली. 2024 मध्ये अटक झालेल्या कलाकारांवर टाकलेली ही नजर.
अल्लू अर्जुन
सध्या अलू अर्जुनच्या अटकेचं प्रकरण बरंच गाजत आहे. 13 डिसेंबर रोजी हैदराबाद पोलिसांच्या टास्क फोर्सने अल्लू अर्जुनला अटक केली. ‘पुष्पा 2’ च्या विशेष स्क्रीनिंग दरम्यान झालेल्या गोंधळामुळे एका महिलेच्या मृत्यूची घटना घडली होती. याच प्रकरणात पोलिसांनी अल्लू अर्जुनला अटक केली आहे. या प्रकरणात त्याला एक दिवस तुरुंगातही राहावं लागलं. सध्या तो जामिनावर आहे. या प्रकरणानंतर बरंच राजकारण झालं. त्याच्या घरात घुसून काही लोकांनी तोडफोडही केली होती. त्यामुळे त्याला घर सोडून दुसरीकडे जावं लागलं.
अभिनेत्री कस्तुरी
कस्तुरीला काही महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. तेलंगणाविरुद्ध विधान केल्यामुळे पोलिसांनी तिला अटक केली. तिची ओळख लपवण्यासाठी ती काही दिवस चुपचाप घरात होती. मात्र, हैदराबाद पोलिसांनी अखेर तिला अटक केली होती.
बाला
अभिनेता बाला याला ऑक्टोबर महिन्यात अटक केली होती. त्याच्या आधीच्या पत्नीच्या तक्रारीवरून त्याला अटक करण्यात आली. सोशल मीडियावर स्वत:च्या मुलीला बदनाम केल्याच्या आरोपावरून त्याच्या विरोधात खटला भरण्यात आला आहे.
सिद्धीक
हेमा समितीचा रिपोर्ट आल्यानंतर अनेक महिलांनी शोषणाच्या तक्रारी केल्या. यातील बऱ्याचश्या तक्रारी या अभिनेता सिद्धीकच्या विरोधात होत्या. 2016 मध्ये एका महिला कलाकारवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावर सिद्धीकला अटक करण्यात आली.
बायजू संतोष
मद्यपान करून वाहन चालवताना बायजू संतोषला अटक करण्यात आली होती. थोडक्यात दुर्घटना घडली होती आणि त्याच्या वाहनाने बाईकला धडक दिली होती.
गणपती
गणपतीला मद्यपान करून वाहन चालवण्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती. मात्र, नंतर त्याला जामिनावर सोडण्यात आलं होतं.
विनायकन
मद्यपान करून धांगडधिंगा केल्याचा विनायकनवर आरोप आहे. गोव्याहून कोचीला जात असताना त्याने मद्यपान करून गोंधळ घातला होता. इंडिगो एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यांसोबत वाद घालून तो अडचणीत आला होता.
मुकेश
अभिनेता मुकेश याच्यावर एका अभिनेत्रीने बलात्काराचा आरोप केला होता. ही 2011ची घटना होती. पण ऑक्टोबरमध्ये त्याला अटक करण्यात आली होती. सध्या तो जामिनावर आहे.
दर्शन थूगूदेप
कन्नड चित्रपट अभिनेता दर्शन थूगुदीपला जून महिन्यात हत्या प्रकरणात अटक झाली होती. रेणू स्वामीच्या मृत्यूशी संबंधित आरोपावरून त्याला अटक केली. हे प्रकरण केवळ कर्नाटकच नव्हे तर देशभर गाजलं होतं.