Kaali: “माँ काली मांस-मदिरेचा स्वीकार करणारी देवी”, खासदाराच्या वक्तव्याचं कौतुक करणाऱ्या स्वरावर भडकले नेटकरी
महुआ यांच्याविरोधात भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. वादग्रस्त वक्तव्याबद्दल त्यांनी माफी मागावी, अशी मागणी केली जात आहे. त्यातच अभिनेत्री स्वरा भास्करने (Swara Bhasker) महुआ यांच्या विधानाचं कौतुक केल्याने ट्विटरवर नेटकरी तिच्यावर संतापले आहेत.
एकीकडे लीना मणिमेकलाई यांच्या काली (Kaali) या डॉक्युमेंट्रीच्या पोस्टरवरून वाद वाढतच चालला आहे. तर दुसरीकडे कोलकात्याच्या टीएमसी खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांच्या देवी कालीवरील वक्तव्यानंतर वातावरण आणखीनच तापलं आहे. महुआ यांच्याविरोधात भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. वादग्रस्त वक्तव्याबद्दल त्यांनी माफी मागावी, अशी मागणी केली जात आहे. त्यातच अभिनेत्री स्वरा भास्करने (Swara Bhasker) महुआ यांच्या विधानाचं कौतुक केल्याने ट्विटरवर नेटकरी तिच्यावर संतापले आहेत. “माँ काली ही मांस आणि मदिरा यांचा स्वीकार करणारी देवी आहे”, असं महुआ यांनी एका कार्यक्रमात म्हटलं. त्यावरून हा वाद निर्माण झाला आहे. काली या डॉक्युमेंट्रीच्या वादग्रस्त पोस्टरबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता.
नेमकं काय म्हणाल्या महुआ मोईत्रा?
एका कार्यक्रमात बोलताना महुआ मोइत्रा यांनी म्हटलं की, “तुम्ही तुमच्या देवाला कसं पाहता हे तुमच्यावर अवलंबून आहे. भूतान आणि सिक्कीमला गेलात तर तिथल्या देवाला पूजेत व्हिस्की अर्पण केली जाते. तेच जर तुम्ही उत्तर प्रदेशातील एखाद्याला प्रसाद म्हणून व्हिस्की दिली तर त्यांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. माझ्यासाठी देवी काली ही मांसाहार करणारी आणि मद्यपान करणारी देवी आहे. काली देवीची अनेक रूपं आहेत.”
. @MahuaMoitra is awesome! More power to her voice! ?
— Swara Bhasker (@ReallySwara) July 6, 2022
एकीकडे त्यांच्या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण होत असताना स्वराने त्याचं कौतुक करणारं एक ट्विट केलं. “महुआ मोईत्रा तुम्ही भारी आहात, तुमच्या आवाजाला आणखी बळ मिळो”, असं तिने ट्विट केलं. यावरून नेटकऱ्यांनी स्वरावर राग व्यक्त केला आहे. कमेंट्समध्ये अनेकांनी तिच्यावर टीका केली आहे.
स्वराचं आणखी एक ट्विट-
Dear Hindu RW, and others scared by RW; If you don’t understand the diversity within Hinduism itself, if you cannot accept the different rituals and traditions of Hindu practice.. aren’t you disrespecting our religion?
— Swara Bhasker (@ReallySwara) July 6, 2022
‘उजव्या विचारसरणीचे प्रिय हिंदू आणि उजव्या विसारसरणीद्वारे घाबरलेले इतर.. जर तुम्हाला हिंदू धर्मातील विविधता समजत नसेल, जर तुम्ही हिंदू धर्मातील विविध विधी आणि परंपरा स्वीकारू शकत नसाल तर, तुम्ही आमच्या धर्माचा अनादर तर करत नाही ना?,’ असा सवाल तिने केला.
महुआ मोईत्रा यांची वादावर प्रतिक्रिया
टीएमसी खासदार महुआ मोइत्रा यांनी एका टीव्ही कार्यक्रमात देवीबद्दल केलेल्या या वक्तव्यानंतर पक्षाने त्यापासून फारकत घेतली आहे. टीएमसीने ट्विट करत म्हटलं की, हे त्यांचे स्वतःचे विचार आहेत आणि आम्ही त्याचं समर्थन करत नाही. यानंतर महुआ यांनी पक्षाचं अधिक ट्विटर अकाऊंटला अनफॉलो केलं आहे. तसंच पश्चिम बंगालमधील भाजप नेत्यांनी मोईत्रा यांच्याविरोधात अनेक तक्रारी दाखल केल्या आहेत. भाजप नेत्यांनी त्यांच्याविरुद्ध केलेल्या तक्रारींवर प्रतिक्रिया देताना महुआ म्हणाल्या, “मी देवी कालीची उपासक आहे. मला कशाचीही भीती वाटत नाही. तुम्ही केलेल्या अवहेलनेची, तुमच्या गुंडगिरीची, तुमच्या पोलिसांची मला भीती वाटत नाही. खासकरून तुम्ही केलेल्या ट्रोलिंगचीही भीती नाही. सत्याला बॅकअप फोर्सची गरज नसते.”