कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली तब्बल आठ महिने तुरुंगवास भोगलेल्या चित्रपट निर्मात्या प्रेरणा अरोरा (Prerna Arora) यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. अंमलबजावणी संचलनालयाने (ED) चित्रपट निर्माती प्रेरणा अरोरा यांच्याविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. ‘पॅडमॅन’, ‘परी’ आणि ‘टॉयलेट: एक प्रेम कथा’ (Toilet Ek Prem Katha) यांसारख्या चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली. प्रेरणा अरोरा यांच्याविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल आहे. आज (बुधवार) ईडीने त्यांना समन्स बजावले होते, मात्र त्या मुंबईत नसल्याने ईडीसमोर हजर राहू शकल्या नाहीत. प्रेरणा यांच्या वतीने त्यांचे वकील ईडी कार्यालयात पोहोचले आणि त्यांनी काही वेळ मागितला आहे.
याआधी प्रेरणा यांनी कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी आठ महिने तुरुंगवास भोगला आहे. 2018 मध्ये त्यांना अटक करण्यात आली आणि त्यानंतर 2019 मध्ये त्यांची जामिनावर सुटका झाली. एका मुलाखतीत त्यांनी आपली चूक मान्य केली होती. नव्याने सुरुवात करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर एका मुलाखतीत प्रेरणा म्हणाल्या होत्या की, “मला काय बोलावं तेच समजत नाही. मी खूप मोठी चूक केली आहे, किंबहुना बऱ्याच चुका केल्या आहेत. माझ्यासोबत एखादा मार्गदर्शक असता तर गोष्टी अशा आणि इतक्या बिघडल्या नसत्या. पण आता मी पुन्हा चित्रपटांची निर्मिती सुरू करणार आहे. मला स्थिर व्हायला थोडा वेळ लागेल.”
ED registers a money laundering case against Bollywood producer Prerna Arora
— ANI (@ANI) July 20, 2022
प्रेरणा यांच्यावर अनेक फायनान्सर्सनी फसवणूक आणि पैसे परत न केल्याचा आरोप केला होता. निर्माते वाशू भगनानी आणि त्यांच्या प्रोडक्शन कंपनीने प्रेरणा विरोधात नोटीस पाठवली होती. वाशू भगनानी यांनी आपल्या तक्रारीत प्रेरणा, त्यांच्या आई आणि क्रिअर्ज एंटरटेनमेंटच्या भागीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. भगनानी यांनी प्रेरणा यांच्याकडे 31.6 कोटी त्वरित परत करण्याची मागणी केली होती.
प्रेरणा यांनी अनेक फायनान्सर्सकडून पैसे घेतल्याचं चार्टशीटमध्ये उघड झालं होतं. एवढंच नाही तर त्यांनी त्या पैशातून सुनील शेट्टीच्या रिअल इस्टेट कंपनीमार्फत 8 कोटींचा बंगला खरेदी केला होता. याशिवाय प्रेरणा यांनी अनेक सोयीसुविधांवर कोट्यवधी रुपये खर्च केले होते.