Vivek Agnihotri: सलमान रश्दींवरील हल्ल्याचा निषेध करणाऱ्या जावेद अख्तरांवर भडकले विवेक अग्निहोत्री
रश्दी यांच्यावरील हल्ल्याचा जगभरातून निषेध होत आहे. त्याचबरोबर बॉलिवूड कलाकारांनीही या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. अभिनेत्री कंगना रनौत आणि गीतकार जावेद अख्तर यांनी या हल्ल्याचा निषेध करत दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
आपल्या लेखणीने जगाला हादरवून सोडण्याची ताकद असलेले प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी (Salman Rushdie) यांच्यावर शुक्रवारी हल्ला झाला. न्यूयॉर्कमध्ये (New York) झालेल्या या जीवघेण्या हल्ल्यानंतर ते सध्या मृत्यूशी झुंज देत आहे. रश्दी यांच्यावरील हल्ल्याचा जगभरातून निषेध होत आहे. त्याचबरोबर बॉलिवूड कलाकारांनीही या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. अभिनेत्री कंगना रनौत आणि गीतकार जावेद अख्तर यांनी या हल्ल्याचा निषेध करत दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. दरम्यान आता ‘द काश्मीर फाईल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी जावेद अख्तर यांच्यावर निशाणा साधला आहे.
या हल्ल्याचा निषेध करणाऱ्या जावेद यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया व्यक्त करताना विवेकने त्यांना प्रश्नही विचारला आहे. जावेद यांचं ट्विट शेअर करत विवेक यांनी विचारलं, “सर, जे नुपूर शर्मा विरोधात ‘सर तन से जुदा’ मोहीम चालवत आहेत, अशा हल्लेखोरांसाठी तुम्ही काही सल्ला द्याल का किंवा काही सांगाल का? काही जण फॅक्ट चेकर्सच्या वेशाआड लपून बसले आहेत.”
Sir, any words of advise for ‘some fanatics’ and ‘attackers’ who have been running ‘sar tan se juda’ campaign against Nupur Sharma – disguised as Fact-Checker? pic.twitter.com/rFTIfRTVzL
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) August 13, 2022
जावेद अख्तर यांनी न्यूयॉर्कमध्ये सलमान रश्दी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करणारं ट्विट केलं होतं. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले, ‘सलमान रश्दी यांच्यावर एका माथेफिरूने केलेल्या रानटी हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. मला आशा आहे की न्यूयॉर्क पोलीस आणि न्यायालय या प्रकरणी हल्लेखोरावर कठोर कारवाई करतील.’ याशिवाय कंगना रनौतनेही सोशल मीडियाच्या माध्यमाद्वारे या हल्ल्याचा निषेध केला आहे. ‘आणखी एक दिवस, जिहादींचं आणखी एक भयानक कृत्य. ‘द सॅटनिक व्हर्सेस’ हे त्यांच्या काळातील सर्वात महान पुस्तकांपैकी एक होतं. माझ्याकडे शब्द नाहीत, मी हादरलेय.. भयंकर,’ असं तिने लिहिलंय.
भारतीय वंशाचे बुकर पुरस्कार विजेते लेखक सलमान रश्दी यांच्यावर शुक्रवारी व्याख्यानाच्या कार्यक्रमात एका माथेफिरुने चाकूहल्ला केला. त्यात त्यांच्या मानेला गंभीर जखम झाली असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पश्चिम न्यू यॉर्कमधील एका संस्थेने आयोजित केलेल्या व्याख्यानाच्या कार्यक्रमाला रश्दी मंचावर उपस्थित होते. ते व्याख्यान सुरू करणार तोच हल्लेखोराने मंचावर धाव घेऊन त्यांच्यावर आणि संवादकावर हल्ला केला.