उगाचचा दिखावा करू नका..; स्वत:च्याच मुलांना असं का म्हणाले बोनी कपूर?
सोशल मीडियावर होत असलेल्या ट्रोलिंगला अनुसरून निर्माते बोनी कपूर यांनी त्यांच्या मुलांना सल्ला दिला आहे. अर्जुन कपूर आणि जान्हवी कपूरला सतत ट्रोल केलं जातं, याची कल्पना त्यांना आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते याविषयी व्यक्त झाले.
कलाविश्वात करणाऱ्यांना कधी ना कधी तरी सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावाच लागतो. बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत, जे सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर येतात. निर्माते बोनी कपूर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूरसुद्धा याला अपवाद नाही. स्टारकिड असल्याने जान्हवी आणि खुशी कपूरला इंडस्ट्रीत सहज संधी मिळत असली तरी विविध प्रसंगी त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. बोनी कपूर यांचा मुलगा अर्जुन कपूरवरही त्याच्या खासगी आयुष्यावरून अनेकदा टीका झाली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बोनी कपूर या ट्रोलिंगविषयी व्यक्त झाले. अशा टीकांना कशापद्धतीने सामोरं जावं, याचा सल्ला बोनी कपूर यांनी मुलांना दिला आहे.
सोशल मीडियावर जान्हवी कपूर आणि अर्जुन कपूर यांना खूप ट्रोल केलं जातं, याची कल्पना बोनी कपूर यांना आहे. जान्हवीला तिच्या लूक्स आणि अभिनयकौशल्यामुळे ट्रोलिंगला सामोरं जावं लागतं. तर वयाने मोठ्या असलेल्या अभिनेत्री मलायका अरोराला डेट करत असल्यामुळे अर्जुनवर अनेकदा टीका होते. अशा ट्रोलिंगना सामोरं जाण्यासाठी बोनी कपूर यांनी मुलांना मोलाचा सल्ला आहे.
View this post on Instagram
या मुलाखतीत ते म्हणाले, “माझ्या मुलांना माझा हाच सल्ला आहे की तुम्ही जे काही करत आहात किंवा करण्याची योजना आखत आहात, ते सन्मानपूर्वक करा. तुमचा दृष्टीकोन हा आदर करण्यासारखा असायला हवा. मी त्यांना नेहमी हे सांगत आलोय की शक्य तितकं सर्वसामान्य राहा. उगाचचा दिखावा करू नका किंवा जे तुम्ही नाही आहात ते बनण्याचा प्रयत्न करू नका.”
याआधी दिलेल्या एका मुलाखतीत जान्हवीने ट्रोलिंगचा उल्लेख करत आई श्रीदेवी यांच्याविषयीचा किस्सा सांगितला होता. स्टारकिड असल्याने सर्वकाही आयतं मिळालं अशी टीका होऊ नये म्हणून जान्हवीने श्रीदेवी यांना ‘धडक’च्या सेटवर येण्यास नकार दिला होता. आपल्या मुलीच्या पहिल्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सेटवर जावं, तिला भेट द्यावी आणि तिची मदत करावी अशी श्रीदेवी यांची खूप इच्छा होती. पण सेटवर आपल्याविषयी उलटसुलट चर्चा सुरू होईल, या भीतीने तिने आईला बोलावणं टाळलं होतं. मात्र याच गोष्टीचा पश्चात्ताप होत असल्याची भावना तिने आता व्यक्त केली. लोकांचा विचार न करता मी आईच्या मदत करण्याच्या भावनेला समजून घेतलं असतं तर मला त्यांच्यासोबत चांगला वेळ घालवता असता, अशी खंत तिने बोलून दाखवली.