Jawan | ‘आमची मंदिरं म्हणजे तुझे स्टुडिओ नाहीत’; शाहरुखच्या ‘जवान’विरोधात बॉयकॉट ट्रेंड सुरू
प्रदर्शनाच्या एक दिवस आधी शाहरुख खानच्या 'जवान' या चित्रपटाविरोधात ट्विटरवर बॉयकॉट ट्रेंड सुरू झाला आहे. शाहरुखच्या एका कृत्यावर नेटकरी नाराज झाले आहेत. चित्रपट प्रदर्शनापूर्वीच तुला हिंदू मंदिरं आठवतात का, असा सवाल नेटकऱ्यांनी केला आहे.
मुंबई | 6 सप्टेंबर 2023 : अभिनेता शाहरुख खानचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘जवान’ हा चित्रपट येत्या 7 सप्टेंबर रोजी जगभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. ‘जवान’ची ॲडव्हान्स बुकिंगसुद्धा जोरदार सुरू आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी हा चित्रपट कमाईचा नवा विक्रम रचणार, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. निर्माते आणि चित्रपट व्यापार विश्लेषक गिरीश जोहर यांच्या मते शाहरुखचा ‘जवान’ हा चित्रपट पहिल्याच दिवशी जगभरात 100 कोटी रुपयांचा बिझनेस करू शकतो. सोशल मीडियावरही किंग खानचे चाहते या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहेत. तर ‘जवान’च्या प्रदर्शनापूर्वी शाहरुख तिरुपती बालाजी मंदिरात दर्शनासाठी पोहोचला होता. एकीकडे या चित्रपटासाठी काही प्रेक्षक उत्सुक आहेत, तर दुसरीकडे किंग खानचं मंदिरात जाणं काहींना पसंत पडलं नाही. त्यामुळे सोशल मीडियावर शाहरुख खानविरोधात ट्रोलिंग सुरू झाली आहे. चित्रपट प्रदर्शनाच्या एक दिवस आधीच ट्विटरवर Boycott Jawan Movie हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला आहे.
मंदिरात जाऊन दर्शन घेण्यावरून वाद
शाहरुख खान नुकताच अभिनेत्री नयनतारा आणि मुलगी सुहाना खान यांच्यासोबत तिरुपतीला पोहोचला होता. त्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर ट्विटरवर बॉयकॉट जवान मूव्ही हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला. एका युजरने या हॅशटॅगचा वापर करत लिहिलं, ‘आमची मंदिरं म्हणजे तुझ्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठीचे स्टुडिओज नाहीत. चित्रपटाच्या प्रदर्शनाआधीच तुला हिंदू मंदिरं कसे लक्षात येतात? हा मूर्खपणा बंद कर.’ तर दुसऱ्या युजरने म्हटलंय, ‘हा व्यक्ती वारंवार ही गोष्ट सिद्ध करू पाहतो की तो योग्य आहे आणि इतर भारतीय चुकीचे आहेत.’
Our Temples are not your studios for promotional gimmicks.
Why just before a movie release you remember Hindu temples ?
STOP THIS NONSENSE !!#BoycottJawanMovie pic.twitter.com/LFHOMd1Bt1
— Rajesh Bhatt 🔥🚩 🇮🇳 (@RajeshRB001) September 5, 2023
आणखी एका युजरने लिहिलं, ‘मी जवान या चित्रपटाला कोणत्याही धर्म किंवा समुदायाच्या कारणामुळे विरोध किंवा सपोर्ट करत नाहीये. पण हा चित्रपट क्रिमिनल बॉलीवूडचा प्रॉडक्शन आहे, ज्याने माझ्या सुशांत सिंह राजपूतचा हक्क आणि आदर हिरावून घेतला.’
‘जवान’ची जबरदस्त ॲडव्हान्स बुकिंग
‘जवान’च्या ॲडव्हान्स बुकिंगबद्दल बोलायचं झाल्यास, आतापर्यंत या चित्रपटाची दहा लाखांहून अधिक तिकिटं विकली गेली आहेत. ॲडव्हान्स बुकिंगद्वारे जवानने आतापर्यंत जवळपास 27 कोटी रुपयांची कमाई केली आहे. जवान हा चित्रपट ओपनिंगलाच जगभरात शंभर कोटी रुपयांची कमाई करू शकेल, असा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषक गिरीश जोहर यांनी वर्तवला आहे. यामध्ये 40 कोटी रुपये परदेशातून आणि 60 कोटी रुपये भारतातून कमाई होण्याची शक्यता आहे.