BTS hiatus: जगप्रसिद्ध BTS बँडने चाहत्यांना दिला शॉक! घेतला ‘हा’ मोठा निर्णय
यापुढे वैयक्तिक प्रोजेक्ट्सवर काही काळ काम करण्यासाठी हा ब्रेक (BTS hiatus) घेणं गरजेचं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. हे सांगताना बीटीएसचे सदस्य भावूक झाले होते. या निर्णयानंतर बुधवारी सकाळी त्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पहायला मिळाली.
गेल्या काही वर्षांत कोरियन म्युझिक, कोरियन ड्रामा आणि कोरियन वेब सीरिज यांची क्रेझ जगभरात वाढताना पहायला मिळतेय. के पॉप आणि के ड्रामाचे असंख्य चाहते भारतातही आहेत. याच चाहत्यांना मंगळवारी संध्याकाळी आश्चर्याचा मोठा धक्का बसला, जेव्हा ‘बीटीएस’ (BTS) या के पॉप बँडने (K-Pop band) ग्रुप म्हणून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. 12 जून 2013 रोजी ‘बीटीएस’ या कोरियन पॉप बँडच्या नावांतर्गत सात तरुणांच्या एका ग्रुपने पॉपविश्वात पदार्पण केलं. नुकतंच या बँडने नऊ वर्षे पूर्ण केली असून याच निमित्त मंगळवारी ते सोशल मीडियावर चाहत्यांशी गप्पा मारण्यासाठी लाइव्ह आले. यावेळी त्यांनी ग्रुप म्हणून काही काळ ब्रेक घेणार असल्याचं जाहीर केलं आणि सर्वांनाच मोठा धक्का दिला. यापुढे वैयक्तिक प्रोजेक्ट्सवर काही काळ काम करण्यासाठी हा ब्रेक (BTS hiatus) घेणं गरजेचं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. हे सांगताना बीटीएसचे सदस्य भावूक झाले होते. या निर्णयानंतर बुधवारी सकाळी त्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पहायला मिळाली.
काय आहे BTS?
‘बटर’, ‘डायनामाइट’, ‘परमिशन टू डान्स’ ही गाणी कधी तुमच्या कानावर पडली असतील, तर तुम्हाला बीटीएस म्हणजे काय याची थोडीफार कल्पना असेल. आरएम, शुगा, जिमीन, जंगकुक, व्ही, जे होप आणि जीन अशा सात तरुणांचा हा बँड आहे. गेल्या नऊ वर्षांत या बँडने एकापेक्षा एक दमदार म्युझिक अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहेत. नुकतीच या सात जणांनी ‘व्हाइट हाऊस’मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचीही भेट घेतली. संगीत विश्वातील अत्यंत प्रतिष्ठित ग्रॅमी या पुरस्कारासाठी या बँडला दोन वेळा नामांकन मिळालं आहे. याशिवाय अनेक पुरस्कार त्यांनी आपल्या नावे केली असून पॉपविश्वात अनेक विक्रमसुद्धा रचले आहेत.
ट्विट-
“You were with us for almost 10 years. We’re each going to take some time to have fun and experience lots of things. We promise we will return someday even more mature than we are now.
I hope that you could give us your blessing” ? pic.twitter.com/HhL9vpdusn
— BTS Charts & Translations⁷ (@charts_k) June 14, 2022
बीटीएसने काही काळासाठी हा ब्रेक घेणार असल्याचं जाहीर केलं असलं तरी हा ब्रेक किती काळासाठी असेल त्याबद्दलची निश्चित माहिती देण्यात आली नाही. या काळात हे सात जण त्यांच्या वैयक्तिक प्रोजेक्टवर काम करणार आहेत. या ब्रेकबद्दल बोलताना ग्रुपचा लीडर आरएम म्हणाला, “ग्रुपचे सर्व सदस्य खूपच थकले आहेत. इतर ग्रुप्सपेक्षा बीटीएस खूप वेगळा आहे असं मला नेहमी वाटायचं. पण के-पॉप आणि आयडॉल सिस्टिमची ही एकच समस्या आहे की ते तुम्हाला मोठं होण्यासाठी थोडा वैयक्तिक वेळच देत नाहीत. तुम्हाला सतत संगीताची निर्मिती आणि सतत काहीतरी करत राहावं लागतं. गेल्या 10 वर्षांत एक व्यक्ती म्हणून मी खूप बदललोय आणि आता मला स्वत:साठी काही वेळ हवा आहे. स्वत:साठी ब्रेक घेतानाही आम्हाला तुमची माफी मागावी लागतेय. आम्ही काहीतरी चुकीचं करतोय अशी भावना मनात येतेय. पण आम्हाला आमच्यासाठी आता काही वेळ हवा आहे.” हे सांगताना त्याला अश्रू अनावर झाले.
बीटीएस डिसबँड होणार का?
बीटीएसने ब्रेकची घोषणा केली म्हणजे ते लवकरच डिसबँड होणार का असाही प्रश्न काहींनी उपस्थित केला. त्यावर ग्रुपचा सदस्य शुगा म्हणाल, “आम्ही डिसबँड होत नाही आहोत. आम्हाला फक्त आता आमच्या इच्छेनुसार काम करायचं आहे. आम्ही इतके थकलो आहोत की आता मला गाणं लिहिणंही खूप कठीण वाटतंय. गाण्यातून लोकांना काय संदेश द्यायचा आहे, हेच कळत नाही.” ग्रुपने घेतलेल्या ब्रेककडे चाहत्यांनी नकारात्मक दृष्टीकोनातून पाहू नये अशी विनंती जे होपने केली. “आमच्यासाठी ही एक नवी दिशा आहे. आम्हाला हा बदल सध्या अपेक्षित आहे. बीटीएसचा दुसरा चाप्टर नव्याने तुमच्या भेटीला आणण्यासाठी हा ब्रेक खूप गरजेचा आहे”, असं तो म्हणाला.
बीटीएसने याआधीही 2019 मध्ये आणि डिसेंबर 2021 मध्ये काही आठवड्यांपुरता ब्रेक घेतला होता. आपल्या कुटुंबीयांसाठी आणि स्वत:साठी काही वेळ देता यावा यासाठी त्यांनी हा ब्रेक घेतला होता. बीटीएसचे चाहते ARMY (आर्मी) या नावाने जगभरात ओळखले जातात. बीटीएसने घेतलेल्या या निर्णयाचा आम्ही आदर करतो, त्यांनासुद्धा विश्रांतीची गरज आहे, अशी भावना त्यांनी सोशल मीडियाद्वारे व्यक्त केली.