Adipurush | ‘कुराणवर असा चित्रपट बनवला असता तर..’; ‘आदिपुरुष’च्या निर्मात्यांना हायकोर्टाने सुनावलं
या बिग बजेट चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. शिवाय प्रभास, क्रिती सनॉन, सैफ अली खान यांसारख्या कलाकारांकडून रामायणाची कथा कशी साकारली जाईल, हे अनेकांना पाहायचं होतं. ‘आदिपुरुष’ जेव्हा प्रदर्शित झाला, तेव्हा मात्र प्रेक्षकांची निराशा झाली.
लखनऊ : ‘आदिपुरुष’ या चित्रपटाला प्रमाणपत्र देणं ही सर्वांत मोठी चूक असल्याचं म्हणत अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनऊ खंडपीठाने निर्मात्यांना फटकारलं. ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष या चित्रपटातील संवाद आणि दृश्यांवर आक्षेप घेणाऱ्या दोन जनहित याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आल्या होत्या. त्यावरील सुनावणीदरम्यान कोर्टाने केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि सेन्सॉर बोर्ड यांना वैयक्तिक प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. हायकोर्टाने चित्रपट निर्मात्यांना सर्व धार्मिक ग्रंथ आणि महाकाव्यांपासून दूर राहण्याचं आवाहन केलं. इतकंच नव्हे तर तर कुराण आणि बायबललाही हात लावू नका, असं कोर्टाने सांगितलं.
“कृपया धर्माला चुकीच्या पद्धतीने दाखवू नका. कोर्टाला कोणताच धर्म नसतो. निर्मात्यांना चित्रपटाच्या माध्यमातून फक्त पैसा कमवायचा असतो”, असंही कोर्टाने यावेळी नमूद केलं. हायकोर्टाने चित्रपटावर तीव्र नाराजी व्यक्त करत सांगितलं, की प्रभू श्रीराम, भगवान हनुमान आणि माता सीता यांच्या मानणारे लोक या चित्रपटाला पाहू शकणार नाहीत. यावेळी कोर्टाने निर्मात्यांना हजर राहण्याचेही आदेश दिले आहेत.
“सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्र दिल्यानंतर ते रद्द केलं जाऊ शकत नाही का? चित्रपट 16 जून रोजी प्रदर्शित झाला. आतापर्यंत काही झालं नाही तर तीन दिवसांत काय होईल. जे व्हायचं होतं ते झालं आणि हे बरं झालं की काही झालं नाही. चित्रपट पाहिल्यानंतर लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. आज आपण गप्प राहिलो तर पुढे काय होणार माहितीये का? हे सर्व वाढत चाललंय. एका चित्रपटात मी पाहिलं की भगवान शंकर त्रिशूळ घेऊन धावत आहेत. आता हेच सर्व होणार का”, असा सवाल न्यायमूर्तींनी केला.
“कुराणवर एखादी छोटी डॉक्युमेंट्री बनवून पहा, ज्यामध्ये चुकीच्या गोष्टी दाखवल्या असतील. तेव्हा तुम्हाला समजेल की लोकांच्या भावना दुखावल्यास काय होऊ शकतं? मी हे स्पष्ट करतो की कोणत्याच धर्माच्या धार्मिक ग्रंथांना स्पर्श करू नका. कुराण आणि बायबललाही स्पर्श करू नका. तुम्ही कोणत्याच धर्माबद्दल चुकीचं दाखवू नका. कोर्ट कोणत्याच धर्माला मानत नाही. कोर्ट सर्व लोकांच्या भावनांचा आदर करतो,” असं कोर्टाने स्पष्ट केलं.
‘आदिपुरुष’ हा चित्रपट 16 जून रोजी प्रदर्शित झाला. या बिग बजेट चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. शिवाय प्रभास, क्रिती सनॉन, सैफ अली खान यांसारख्या कलाकारांकडून रामायणाची कथा कशी साकारली जाईल, हे अनेकांना पाहायचं होतं. ‘आदिपुरुष’ जेव्हा प्रदर्शित झाला, तेव्हा मात्र प्रेक्षकांची निराशा झाली. ‘रामायण’ कसं दाखवू नये, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ‘आदिपुरुष’ अशी टिप्पणी अनेकांकडून झाली.