‘सोनं फक्त तळपतच राहिलं तर..’; संघर्षाबद्दल बोलताना ‘छावा’मधील ‘कवी कलश’चा दाटून आला कंठ
'छावा' चित्रपटात कवी कलशची भूमिका साकारलेल्या विनीत कुमार सिंहला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळतंय. विनीत गेल्या अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत स्ट्रगल करतोय. मात्र आता 'छावा'मुळे त्याला लोकप्रियता मिळत आहे. आपल्या संघर्षाबद्दल बोलताना तो एका मुलाखतीत भावूक झाला होता.

एखाद्या चित्रपटातली छोट्यातली छोटी भूमिकासुद्धा प्रेक्षकांच्या मनावर कायमची छाप सोडून जाते. त्यासाठी अभिनेत्याला नायकच बनणं गरजेचं नसतं. सहाय्यक भूमिकेतूनही चमकून उठणाऱ्या कलाकाराला खरा अभिनेता म्हणतात. अशाच शब्दांत सध्या अभिनेता विनीत कुमार सिंहची प्रशंसा होतेय. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या चित्रपटात त्याने छत्रपती संभाजी महाराजांचे कवी मित्र छंदोगामात्य (कवी कलश) यांची भूमिका साकारली आहे. विनीतने इतक्या प्रतिभेनं ही भूमिका साकारली आहे की सध्या सोशल मीडियावर त्याचीच चर्चा होतेय. त्याच्या भूमिकेचे काही सीन्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ‘छावा’मुळे विनीतला इतकी लोकप्रियता मिळत असली तरी तो गेल्या 20 वर्षांपासून अधिक काळापासून फिल्म इंडस्ट्रीत संघर्ष करतोय. आपल्या संघर्षाबद्दल बोलताना एका मुलाखतीत विनीतचा कंठ दाटून आला होता.
23 वर्षांपासून विनीतचा संघर्ष
‘बॉलिवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत विनीत म्हणाला, “मला या शहरात (मुंबई) 23 वर्षे झाली, पण आजसुद्धा इथे माझं हक्काचं घर नाही. ही खूप अजब गोष्ट आहे. इतकं काम करतोय, सगळं काही आहे, पण माझं स्वत:चं घर मी विकत घेऊ शकलो नाही. ज्यावेळी मी ‘धोखा’ या चित्रपटात काम करत होतो, तेव्हा आलिया भट्ट ही महेश भट्ट सरांच्या कुशीत बसायची, इतकी लहान होती. त्यावेळीही मी संघर्ष करत होतो आणि आजसुद्धा मी संघर्षच करतोय. आलिया ही खूप प्रतिभावान अभिनेत्री आहे.”




View this post on Instagram
“लोकं म्हणतात की सोनं आगीत तळपूनच चमकतो. पण सोनं सतत तळपतच असेल तर ते काय कामाचं? त्याला कोण परिधान करणार? माझा खूप सारा वेळ हा तळपण्यातच निघून गेला (कंठ दाटून येतो). सर्वजण म्हणतात की संघर्ष गरजेचा असतो. मी कुठे म्हणतोय की मला संघर्षापासून पळायचं आहे. पण किती? मी काय मागतोय? मला फक्त चांगलं काम करायचं आहे, चांगल्या चित्रपटांचा मला भाग बनायचं आहे, चांगल्या दिग्दर्शकांसोबत आणि निर्मात्यांसोबत मला काम करायचं आहे. मी माझं काम अत्यंत प्रामाणिकपणे करतोय”, असं म्हणतात विनीतचा कंठ दाटून आला. विनीतच्या मुलाखतीची ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.