खरा मावळाच हे करू शकतो..; ‘छावा’च्या सेटवरील हा व्हिडीओ एकदा पहाच
'छावा'च्या सेटवरील हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. क्लायमॅक्स सीनच्या शूटिंगनंतरचा हा व्हिडीओ आहे. कला दिग्दर्शक बाळा पाटीलने त्याच्या अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला ‘छावा’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या तिसऱ्या आठवड्यातही तुफान चर्चेत आहे. अजूनही हा चित्रपट थिएटरमध्ये बघण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहेत. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित या चित्रपटाचा क्लायमॅक्स पाहिल्यानंतर प्रेक्षक पाणावलेल्या डोळ्यांनी थिएटरमधून बाहेर पडत आहेत. गणोजी आणि कान्होजी या आपल्याच माणसांनी केलेल्या फितुरीमुळे छत्रपती संभाजी महाराजांना कैद करण्यात मुघल शासक औरंगजेबाला यश मिळतं. त्यानंतर त्यांचा अतोनात छळ केला जातो. हाच सीन ‘छावा’च्या क्लायमॅक्समध्ये दाखवण्यात आला आहे. या क्लायमॅक्सच्या शूटिंगनंतर सेटवर काय घडलं, हे दाखवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कला दिग्दर्शक बाळा पाटीलने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
या व्हिडीओमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेतील अभिनेता विकी कौशलला बाळा करकचून मिठी मारताना दिसतोय. क्लायमॅक्सच्या शूटिंगनंतर विकीच्या शरीरावरील रंग जसंच्या तसं असतानाही बाळाने त्याला घट्ट मिठी मारली आहे. यावेळी सेटवर उपस्थित इतरही क्रू मेंबर्स भारावलेले दिसत आहेत.




View this post on Instagram
‘तुम्ही त्यागीले शरीर तुमचे, पण तुम हो अमर महाराज, तुमचे विचार आम्हास सदैव अजरामर महाराज, आप सदैव अजरामर महाराज.., कसे आभार करावे तुमचे महाराज. तुम्ही त्यागीले प्राण..धर्म अमर करण्या महाराज. महाराज.. तरुणाई रडली पाहुनी गाथा शौर्याची, राज्यात विस्तारली प्रथा बलिदान आणि त्यागाची! स्वीकार करावा माझा मुजरा महाराज.. मुजरा महाराज…मुजरा महाराज. पर जंजिरो मे जकडा राजा मेरा अब भी सबपे भारी हैं. नाट्य रुपात का होईना , सोळावे शतक जगण्याची, महाराजांना मिठी मारण्याचं सौभाग्य मला लाभलंय. असंख्य वेदना जाणवूनही, अलगद चेहऱ्यावर हसू, मुखातून नकळत आलेलं जगदंबचे बोल मी अनुभवल्यात,’ अशा शब्दांत बाळाने भावना व्यक्त केल्या आहेत.
बाळाने पोस्ट केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ‘भाऊंनी शर्ट जपून ठेवला असेल’, असं एकाने लिहिलं. तर ‘खूप छान अभिनय केला आहे विकी कौशलने आणि तू त्याला अशी दाद दिलीस. हे भारावून जाणं एक खरा मावळाच करू शकतो. जगदंब’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘भावा तू भाग्यवान आहेस’ अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.