‘छावा’ची जबरदस्त कामगिरी; ‘या’ ब्लॉकबस्टर चित्रपटाला टाकलं मागे, एकाच दिवशी होणार होता प्रदर्शित
'छावा'ने गेल्या महिनाभरात 'अॅनिमल', 'पठाण', 'गदर 2', 'सालार' यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांना मागे टाकलं आहे. आता लवकरच हा चित्रपट राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्या 'स्त्री 2'लाही मात देण्याची शक्यता आहे.

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला तीस दिवस पूर्ण झाले आहेत. 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतोय. आता प्रदर्शनाच्या महिनाभरानंतर विकी कौशलच्या या चित्रपटाने एका दुसऱ्या ब्लॉकबस्टरचा रेकॉर्ड तोडला आहे. तिसाव्या दिवसाच्या कलेक्शनच्या बाबतीत ‘छावा’ने साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ला मागे टाकलं आहे. विशेष म्हणजे सुरुवातीला ‘छावा’ आणि ‘पुष्पा 2: द रुल’ हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी 6 डिसेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार होते. मात्र अल्लू अर्जुनने ‘छावा’च्या निर्मात्यांना फोन करून प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याची विनंती केली होती. त्यानंतर ‘छावा’च्या प्रदर्शनाची तारीख 6 डिसेंबरवरून 14 फेब्रुवारी करण्यात आली. याचा फायदा या दोन्ही चित्रपटांना झाला. ‘पुष्पा 2’ आणि ‘छावा’ या दोन्ही चित्रपटांनी जोरदार कमाई केली.
‘छावा’ने पहिल्या आठवड्यात 225.28 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. तर दुसऱ्या आठवड्यात या चित्रपटाची कमाई 186.18 कोटी रुपये इतकी झाली होती. तिसऱ्या आठवड्यात 84.94 कोटी रुपये आणि चौथ्या आठवड्यात 43.98 कोटी रुपये कमावून विकी कौशलच्या या चित्रपटाने दमदार कामगिरी केली. 29 व्या दिवशीसुद्धा ‘छावा’ने 7.25 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.




View this post on Instagram
7 मार्चपासून ‘छावा’ हा चित्रपट तेलुगू भाषेतूनही प्रेक्षकांच्या भेटीला आला. हिंदीसोबतच तेलुगू भाषेतही या चित्रपटाने चांगली कमाई केली. तिसाव्या दिवसाच्या कलेक्शनबद्दल बोलायचं झाल्यास, सॅकनिल्कने दिलेल्या वृत्तानुसार, ‘छावा’ने प्रदर्शनाच्या 30 व्या दिवशी 8 कोटी रुपये कमावले आहेत. त्यामुळे देशभरातील या चित्रपटाच्या कमाईचा आकडा 568.18 वर पोहोचला आहे. तिसाव्या दिवसाच्या कमाईच्या बाबतीत ‘छावा’ने ‘पुष्पा 2’ला मात दिली आहे. विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांच्या ‘छावा’ने अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’पेक्षा जवळपास दुप्पट कमाई केली आहे. ‘पुष्पा 2’ने प्रदर्शनाच्या तिसाव्या दिवशी 4.35 कोटी रुपये कमावले होते. विशेष म्हणजे या दोन्ही चित्रपटांमध्ये अभिनेत्री रश्मिका मंदानाने भूमिका साकारली आहे.
‘छावा’मध्ये अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची, रश्मिका मंदानाने महाराणी येसुबाई भोसले यांची आणि अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. याशिवाय चित्रपटात दिव्या दत्ता, आशुतोष राणा, विनीत कुमार सिंह, सुव्रत जोशी, संतोष जुवेकर यांच्याही भूमिका आहेत.