‘छावा’कडे आता फक्त 3 दिवस शिल्लक; त्यानंतर ठप्प होऊ शकते कमाई, काय आहे कारण?
'छावा' या चित्रपटाकडे आता फक्त तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यानंतर त्याच्या कमाईला मोठा ब्रेक लागू शकतो. विकी कौशल आणि रश्मिका मंदानाचा हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला होता.

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नवे विक्रम रचले आहेत. नुकताच हा चित्रपट भारतात सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत ‘स्त्री 2’ला मात देत सातव्या स्थानी पोहोचला आहे. 14 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला असून 50 हून अधिक दिवस तो थिएटरमध्ये टिकून आहे. ‘छावा’च्या 53 व्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. या चित्रपटाने सातव्या आठवड्यात हिंदी आणि तेलुगूमध्ये 609.87 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तर सॅकनिक्लने दिलेल्या वृत्तानुसार, विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांच्या या चित्रपटाने प्रदर्शनाच्या 50 व्या दिवशी 55 लाख रुपये कमावले आहेत. तर 51 आणि 52 व्या दिवशी कमाईचा आकडा वाढून 95 लाख आणि 1.25 कोटी रुपये इतका झाला आहे. ‘छावा’ने 53 व्या दिवशी सकाळी 10.45 वाजेपर्यंत 35 लाख रुपयांचा गल्ला जमवला आहे.
या चित्रपटाच्या कमाईचा आकडा आता 612.97 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. सलमान खानचा ‘सिकंदर’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ‘छावा’ला मोठा फटका बसेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु प्रत्यक्षात उलटंच चित्र पहायला मिळालं. सलमानचा ‘सिकंदर’ फ्लॉप ठरला आणि ‘छावा’ची कमाई थोडी थोडी अजूनही सुरू आहे. परंतु विकी कौशलच्या या चित्रपटाकडे आता चांगल्या कमाईसाठी आणखी फक्त तीनच दिवस शिल्लक राहिले आहेत. कारण 10 एप्रिल रोजी सनी देओलचा ‘जाट’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सनी देओलचा हा चित्रपट संपूर्ण देशभरात प्रदर्शित केला जाणार असल्याने ‘छावा’चे शोज आणखी कमी होऊ शकतात.




View this post on Instagram
‘छावा’ हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित आहे. यामध्ये विकी कौशल, रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा, दिव्या दत्ता, संतोष जुवेकर, सारंग साठ्ये, सुव्रत जोशी यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचा बजेट 130 कोटी रुपये असल्याचं समजतंय. शिवाजी सावंत यांच्या ‘छावा’ या कादंबरीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे. हा विकी कौशलच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. यामध्ये त्याने छत्रपती संभाजी महाराजांची मुख्य भूमिका साकारली आहे.