रणांगणावरचे अस्सल शेर ‘छत्रपती संभाजी’ रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला
फक्त तरुण पिढीच नव्हे तर सर्व वयोगटातील प्रेक्षक वर्ग सध्या ऐतिहासिक सिनेमा मोठ्या पडद्यावर अनुभवण्यासाठी सिनेमागृहाकडे वळले आहेत. ‘छत्रपती संभाजी’ हा ऐतिहासिक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या पहिल्या पोस्टरचं अनावरण करण्यात आलं.
पुणे : 13 जानेवारी 2024 | स्वराज्याच्या रक्षणासाठी चंदनापरी देह झिजवणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे रणांगणावरचे अस्सल शेर होते. स्वराज्याची धुरा खंबीरपणे आपल्या हातात घेऊन प्रचंड पराक्रम गाजवणारे छत्रपती संभाजी महाराज म्हणजे एक अद्भुत व्यक्तिमत्व. धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणाऱ्या या महान योद्धयाचा इतिहास रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे. राकेश सुबेसिंह दुलगज निर्मित आणि दिग्दर्शित ‘छत्रपती संभाजी’ हा मराठी चित्रपट येत्या 26 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी म्हणजे पुण्यातील बलिदान भूमी वडू बुद्रुक याठिकाणी चित्रपटाच्या पोस्टरचं अनावरण करण्यात आलं. ‘छत्रपती संभाजी’ हा चित्रपट मराठी, हिंदी, तमिळ, तेलगू आणि इंग्रजी मध्ये एकाच वेळी प्रदर्शित होत आहे.
छत्रपती संभाजी महाराजांनी सलग नऊ वर्षे मुघल, आदिलशहा, सिद्धी, पोर्तुगीज, इंग्रज, आणि इतर अंतर्गत शत्रूंशी लढा देत, स्वराज्याला टिकवलं आणि वाढविलं. दुर्दम्य इच्छाशक्ती आणि अजोड पराक्रमाच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर त्या साम्राज्याचा विस्तार केला. हिंदवी स्वराज्य निर्माण करणं हे सहज शक्य नव्हतं, पण त्याहून कठीण होतं ते निर्माण केलेलं स्वराज्य टिकवणं, वाढवणं. छत्रपती संभाजी महाराजांनी हे आव्हान स्वीकारलं आणि सक्षमपणे पेललं सुद्धा. अद्वितीय राजकरण, आक्रमक रणनीती आणि रणकौशल्याच्या जोरावर छत्रपती संभाजी महाराजांनी निर्माण केलेला प्रेरणादायी इतिहास ‘छत्रपती संभाजी’ या चित्रपटातून तरुण पिढीला पाहता येणार आहे.
या चित्रपटात प्रमोद पवार, शशांक उदापूरकर, रजित कपूर, दिलीप ताहिल, मृणाल कुलकर्णी, मोहन जोशी, भरत दाभोळकर, लोकेश गुप्ते, बाळ धुरी, दिपक शिर्के, अमित देशमुख, कै. आनंद अभ्यंकर, समीर, मोहिनी पोतदार, प्रिया गमरे या कलाकारांच्या भूमिका आहेत. ‘छत्रपती संभाजी’ या चित्रपटाची कथा सुरेश चिखले यांनी लिहिली आहे. अविनाश विश्वजित, गुरु शर्मा आणि आरव यांचं संगीत या चित्रपटाला लाभलं असून पार्श्वसंगीत अमर-अमित देसाई यांनी दिलं आहे.