शिवाजी साटम यांची सून मुख्य भूमिकेत; ‘आपण यांना पाहिलंत का?’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
शिवाजी साटम यांची सून मधुरा वेलणकर साटम लवकरच व्यावसायिक नाटकातून रंगभूमीवर पुनरागमन करणार आहे. आपण यांना पाहिलंत का, असं या नाटकाचं नाव असून यात ती मुख्य भूमिकेत आहे. यामध्ये तिच्यासोबत तुषार दळवी मुख्य भूमिका साकारणार आहे.
मुंबई : 17 नोव्हेंबर 2023 | ‘सीआयडी’ फेम अभिनेते शिवाजी साटम यांची सून आणि अभिनेत्री मधुरा वेलणकर साटम लवकरच मराठी व्यावसायिक रंगभूमीवर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. विजय केंकरे दिग्दर्शित ‘आपण यांना पाहिलंत का?’ या नाटकात मधुरा साटम आणि तुषार दळवी मुख्य भूमिका साकारणार आहेत. वरदा-वैध निर्मित प्रवेश प्रकाशित या नाटकाची निर्मिती आदिती देवेंद्र राव, वैशाली धनेश पोतदार यांनी केली आहे. सुशील स्वामी यांनी या नाटकाचं लेखन केलं आहे.
आपल्या सुखी संसाराला कोणाची दृष्ट लागू नये असं चाळीशीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या जोडप्याला वाटत असतं. संसारात एकत्र आहोत म्हणजे सगळं शांत आणि निवांत, असं खरंच असतं का? अशातच अचानकपणे त्यांच्या आयुष्यात आणि घरात एक वादळ प्रवेश करतं. या वादळाच्या येण्यानं त्या जोडप्याच्या नात्याचं, त्यांच्या संसाराचं काय होतं? याची नर्म विनोदी गोष्ट ‘आपण यांना पाहिलंत का?’ या नाटकाद्वारे प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. तुषार दळवी आणि मधुरा वेलणकर साटम यांच्यासह विक्रम गायकवाड, श्रुती पाटील यांच्या या नाटकात भूमिका आहेत. अजित परब यांनी नाटकाचं संगीत, शीतल तळपदे यांनी प्रकाश योजना, मंगल केंकरे यांनी वेशभूषा, संदेश बेंद्रे यांनी नेपथ्याची जबाबदारी सांभाळली आहे.
View this post on Instagram
ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे यांनी पती-पत्नीच्या नात्याचा वेध घेणारी अनेक नाटकं दिग्दर्शित केली आहेत. कसदार दिग्दर्शनातून नेमक्या पद्धतीनं आजच्या काळावर ते नाटकातून भाष्य करतात. आता तुषार दळवी, मधुरा वेलणकर साटम, विक्रम गायकवाड, श्रुती पाटील यांच्यासारख्या कसलेल्या कलाकारांना घेऊन ‘आपण यांना पाहिलंत का?’ या नाटकात विजय केंकरे मराठी नाट्यप्रेमींना काय नवीन अनुभव देतात याची उत्सुकता आहे.
शिवाजी साटम यांची सून मधुरा वेलणकर साटमने मराठी आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. ‘सरीवर सरी’मधील गोजिरीच्या भूमिकेसाठी तिचं विशेष कौतुक झालं. 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जजंतरम ममंतरम’ या चित्रपटात तिने राजकुमारी अमोरीची भूमिका साकारली होती. मधुराने डान्सर आणि निवेदिका म्हणून जवळपास 75 हून अधिक स्टेज शोज केले आहेत. मधुराने अभिजीत साटमशी लग्न केलं आहे. तिचे वडील प्रदीप वेलणकरसुद्धा अभिनेते आहेत.