Raju Srivastava: “फक्त चमत्कारच त्याला वाचवू शकेल”; राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबद्दल एहसान कुरेशीची प्रतिक्रिया
दरम्यान, राजू यांचे सहकारी कॉमेडियन एहसान कुरेशी यांनी सांगितलं की, राजू श्रीवास्तव हे ब्रेन डेड (Brain Dead) असून सर्वजण काही चमत्कार (Miracle) घडण्याची वाट पाहत आहेत, ज्यामुळे राजू यांचा जीव वाचू शकेल.
कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांची प्रकृती अजूनही गंभीर आहे. 10 ऑगस्ट रोजी राजू श्रीवास्तव हे वर्कआउट करत असताना अचानक खाली पडले, त्यानंतर त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं. तेव्हापासून ते शुद्धीवर आलेले नाहीत. कुटुंबीय आणि मित्रमंडळी त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत. दरम्यान, राजू यांचे सहकारी कॉमेडियन एहसान कुरेशी यांनी सांगितलं की, राजू श्रीवास्तव हे ब्रेन डेड (Brain Dead) असून सर्वजण काही चमत्कार (Miracle) घडण्याची वाट पाहत आहेत, ज्यामुळे राजू यांचा जीव वाचू शकेल.
केवळ चमत्कारच वाचवू शकेल..
राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीविषयी बोलताना एहसान कुरेशी म्हणाले, “डॉक्टरांनी आपले हात वर केले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत असल्याचं त्यांनी कुटुंबियांना सांगितलं आहे, पण आता केवळ चमत्कारच त्यांना वाचवू शकतो. त्यांच्या मृत्यूची बातमी खोटी आहे. ते ब्रेन डेड झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. आम्ही सर्वजण प्रार्थना करत आहोत आणि काही मिनिटांपूर्वी हनुमान चालिसाचा जप केला आहे. राजू यांचे कुटुंबीय आणि त्यांचे मित्र त्यांच्यासाठी सतत प्रार्थना करत आहेत. एकीकडे डॉक्टरांनी राजूबद्दलची आशा सोडली आहे, तर दुसरीकडे आपला पती लवकरच बरा होईल अशी आशा त्यांची पत्नी शिखा यांना आहे.
राजपाल यादवची प्रतिक्रिया
विनोदी कलाकार राजपाल यादवनेही राजू श्रीवास्तव लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे. राजपाल यादवने गुरुवारी त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये तो म्हणाला “राजू, तू लवकर बरा हो. आम्ही सर्वजण तुझ्यासाठी प्रार्थना करत आहोत. तुझी आतुरतेने वाट पाहत आहोत. तुझं कुटुंब, तुझे हितचिंतक सर्वजण तू लवकर बरा व्हावा आणि रुग्णालयातून बाहेर पडावा यासाठी प्रार्थना करत आहेत.”
Get well soon Raju mere Bhai … miss seeing you. #RajuSrivastav #RajuSrivastavaHealth pic.twitter.com/uccFVh06uI
— Rajpal Naurang Yadav (@rajpalofficial) August 18, 2022
गेल्या 9 दिवसांपासून राजू श्रीवास्तव यांच्यावर उपचार सुरू आहेत. ट्रेडमिलवर व्यायाम करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीने दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेसुद्धा राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.