ब्राह्मणांविरोधातील ‘ती’ आक्षेपार्ह टिप्पणी अनुराग कश्यपच्या अंगाशी; थेट पोलीस आयुक्तांसमोर पोहोचला मुद्दा
दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ झाली आहे. ब्राह्मणांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीमुळे त्यांच्याविरोधात मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी अनुरागने माफीदेखील मागितली आहे.

ब्राह्मणांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीमुळे दिग्दर्शक अनुराग कश्यप वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यांच्याविरोधात मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे वकील आशिष राय आणि पंकज मिश्रा यांनी ही तक्रार दाखल केली आहे. “चित्रपटाच्या प्रमोशनच्या उद्देशाने अनुराग कश्यप यांनी सोशल मीडियावर ब्राह्मणांबद्दल ज्याप्रकारे अत्यंत खालच्या पातळीचे आणि अपमानजनक शब्द वापरले, ते निश्चितच द्वेषपूर्ण भाषणाच्या श्रेणीत येतं. अशा प्रकारच्या द्वेषपूर्ण भाषणाने संपूर्ण ब्राह्मण समाजाला कमी लेखून प्रसिद्धी मिळवण्यासाठी अत्यंत घृणास्पद कृत्य करण्यात आलंय. बीएनएस 2023 च्या कलम 196, 197, 298, 302, 356 (3), 356 (4) आणि आयटी कायद्याच्या विविध कलमांखाली एफआयआर नोंदवण्यासाठी ही तक्रार दाखल करण्यात आली आहे,” अशी माहिती वकिलांनी दिली.
या तक्रारीत विशेषकरून अश्विनी कुमार विरुद्ध युनियन ऑफ इंडिया [WP](c) no. 943 of 2021, अंतर्गत जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वे दाखवली आहेत. ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलंय की द्वेषपूर्ण भाषणासारख्या संवेदनशील कृत्यांविरुद्ध राज्याने स्वत:हून दखल घेऊन कारवाई करावी. जेणेकरून देशातील शांतता आणि सुव्यवस्था कोणत्याही प्रकारे धोक्यात येणार नाही.




View this post on Instagram
ब्राह्मणांविरोधातील टिप्पणीमुळे अनुराग कश्यपला सोशल मीडियावर तुफान ट्रोल करण्यात आलं. शिवाय त्याला आणि त्याच्या कुटुंबीयांना धमक्याही देण्यात आल्या आहेत. यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा त्याने सोशल मीडियावर पोस्ट लिहित माफी मागितली. त्याने लिहिलं, ‘मी माफी मागतो. परंतु ही माफी मी माझ्या पोस्टसाठी नाही तर त्या एका ओळीसाठी मागतोय, ज्याला चुकीच्या पद्धतीने समजलं गेलं आणि द्वेष पसरवला गेला. कोणतंही ॲक्शन किंवा भाषण हे तुमच्या मुलगी, कुटुंबीय, मित्रमैत्रिणी आणि ओळखीच्या व्यक्तींपेक्षा मोठं नाही. त्यांना बलात्काराच्या आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. जे स्वत:ला संस्कारी म्हणवतात, तीच लोकं हे सर्व करत आहेत.’
‘एकदा म्हटलेली गोष्ट परत घेतली जाऊ शकत नाही आणि मी घेणारही नाही. परंतु मला ज्या शिव्या द्यायच्या असतील त्या द्या. माझ्या कुटुंबीयांनी काहीच म्हटलं नाही आणि ते म्हणतही नाहीत. त्यामुळे माझ्याकडून माफी हवी असेल तर ही माझी माफी आहे. ब्राह्मण लोकांनी महिलांना सोडावं, इतके संस्कार तर शास्त्रांमध्येही आहेत, फक्त मनुवादमध्ये नाही. तुम्ही कोणते ब्राह्मण आहात ते ठरवा. बाकी माझ्याकडून माफी मागतो’, असं त्यांनी लिहिलं होतं.