दादर स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर कुलीला आढळला अमिताभ बच्चन यांच्या खास व्यक्तीचा फोन, पुढे काय घडलं ते वाचा..
सोमवारी नेहमीप्रमाणे दशरत हे दादर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर कुलीचं काम करत होते. रात्री 11.40 च्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक चारवरील काम आटपून ते झोपण्यासाठी जात होते तेव्हाच..
मुंबई : दशरथ दौंड (वय 62 वर्षे) हे गेल्या तीन दशकांपासून दादर रेल्वे स्टेशनवर कुलीचं काम करत आहेत. सोमवारी जेव्हा त्यांना प्लॅटफॉर्मवरील खुर्चीवर महागडं फोन आढळलं, तेव्हा त्यांनी तो लगेचंच स्टेशनवरील जीपीआरकडे जमा केला. दशरथ यांचा हा प्रामाणिकपणा पाहून मोबाइलच्या मालकाने त्यांना बक्षिस दिलं. हा मोबाइल फोन होता अमिताभ बच्चन यांच्या खास मेकअप आर्टिस्टचा. जवळपास 1.4 लाख रुपये त्या फोनची किंमत होती. आपला फोन सुरक्षितरित्या परत मिळाल्यानंतर मेकअप आर्टिस्ट दीपक सावंत यांनी दशरत यांचं कौतुक करत त्यांना बक्षिस म्हणून हजार रुपये दिले.
प्लॅटफॉर्मवर आढळला फोन
सोमवारी नेहमीप्रमाणे दशरत हे दादर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर कुलीचं काम करत होते. रात्री 11.40 च्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक चारवरील काम आटपून ते झोपण्यासाठी जात होते. त्या प्लॅटफॉर्मवरील ट्रेन अमृतसरला निघाली होती. “प्लॅटफॉर्मवर चालत असताना मला तिथल्या एका खुर्चीजवळ मोबाइल फोन आढळला. मी तो फोन उचलला आणि आजूबाजूच्या प्रवाशांना त्याबद्दल विचारलं. तिथे असलेल्यांपैकी कोणाचाच तो फोन नव्हता”, असं दशरथ म्हणाले.
अमिताभ बच्चन यांच्या मेकअप आर्टिस्टचा फोन
त्यानंतर ते फोन घेऊन थेट दादर जीपीआर चौकीकडे गेले. “मला मोबाइल फोन वापरण्याविषयी फारशी माहिती नाही आणि इतरांची कोणतीही वस्तू स्वत:कडे ठेवत नाही”, असं म्हणत त्यांनी तो फोन पोलिसांकडे सोपवला. त्यानंतर ते रेल्वे स्टेशनवर झोपण्यासाठी गेले. थोड्या वेळानंतर त्यांना पोलिसांचा फोन आला. अमिताभ बच्चन यांचे मेकअप आर्टिस्ट दीपक सावंत हे अमृतसरच्या ट्रेनमध्ये चढण्याआधी प्लॅटफॉर्मवर फोन विसरून गेले होते. आपण फोन विसरल्याचं लक्षात येताच त्यांनी दुसऱ्यांच्या मदतीने स्वत:चा नंबर डायल केला. तो फोन पोलिसांनी उचलला आणि चौकीत येऊन तो घेऊन जाण्यास सांगितलं. त्यानंतर दीपक यांनी त्यांचा मुलगा दानवीर याला मोबाइल घेण्यासाठी चौकीत पाठवलं.
कुली दशरथ यांचं पोलिसांकडून कौतुक
“दानवीर यांना माझ्या हस्ते मोबाइल फोन द्यावा अशी पोलिसांची इच्छा होती. त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी मीसुद्धा उत्सुक होतो”, अशी प्रतिक्रिया दशरथ यांनी आनंदाने दिली. त्यांच्या या प्रामाणिकपणाचं कौतुक पोलिसांनी आणि दीपक सावंत यांनी केलं. दशरथ दौंड हे 70 च्या दशकात संगमनेरहून मुंबईला आले होते. त्यांना चार मुलं आहेत. दशरत हे त्यांच्या कुटुंबीयांसह ठाण्यात राहतात.