मुंबई | 21 ऑगस्ट 2023 : बॉलिवूड इंडस्ट्रीत असे फार कमी कलाकार आहेत, जे कॉमेडीसोबतच खलनायकाची भूमिका उत्तमरित्या साकारू शकतात. हे कलाकार पडद्यावर कॉमेडी करताना प्रेक्षकांना खळखळून हसवतात, तर खलनायकाच्या भूमिकेतून अक्षरश: अंगाचा थरकाप उडवतात. असाच एक कलाकार या फोटोमध्ये पहायला मिळत आहे. फोटोत दिसणारा हा तरुण बॉलिवूड चित्रपटांमध्ये कधी कॉमेडी किंग बनून तर कधी खतरनाक व्हिलेन बनून प्रेक्षकांच्या भेटीला आला. या ब्लॅक अँड व्हाइट फोटोमध्ये दोन तरुण दिसून येत आहेत. त्यापैकी डाव्या बाजूला टी-शर्ट परिधान करून उभ्या असलेल्या तरुण मुलाकडे निरखून पहा. या अभिनेत्याला ओळखू शकलात का?
फोटोत दिसणारा हा तरुण ‘नंदू सबका बंधू’ म्हणजेच अभिनेते शक्ती कपूर आहेत. शक्ती कपूर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये त्यांच्या बाजूला खास मित्र सुनील नरुला दिसत आहेत. हा फोटो जवळपास 42 ते 45 वर्षे जुना आहे. फार क्वचित लोकांना माहीत असेल की शक्ती कपूर यांचं खरं नाव सुनील सिकंदर लाल कपूर असं आहे. त्यांना शक्ती हे नाव कसं मिळालं यामागे एक रंजक कथा आहे.
‘रॉकी’ या चित्रपटात त्यांनी साकारलेली नकारात्मक भूमिका पाहून दिग्गज अभिनेते सुनील दत्त आणि त्यांची पत्नी नरगिस फार प्रभावित झाले होते. त्यानंतर त्यांनी सुनील हे नाव बदलून शक्ती असं ठेवलं. शक्ती कपूर हे सुनील दत्त यांना गॉडफादर मानायचे. शक्ती कपूर हे बॉलिवूडमधील असे कलाकार आहेत, ज्यांनी प्रत्येक प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. शक्ती कपूर यांनी 1977 मध्ये ‘अलीबाबा मरजीना’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर त्यांनी दमदार भूमिका साकारल्या.
‘राजा बाबू’, ‘गुंडा’, ‘अंदाज अपना अपना’, ‘कर्मा’, ‘भागम भाग’, ‘हम साथ साथ है’, ‘इंडियन’, ‘हिरो’, ‘कुली नंबर वन’, ‘जुडवा’, ‘चालबाज’ यांसारख्या 100 हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी उल्लेखनीय काम केलं आहे. राजा बाबू या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट कॉमेडी अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. इतकंच नव्हे तर शक्ती कपूर यांनी टीव्ही इंडस्ट्रीतही काम केलं आहे. बिग बॉसच्या पाचव्या सिझनमध्ये ते स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते.