सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या (Jacqueline Fernandez) अडचणीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. या प्रकरणात आरोपी म्हणून जॅकलिनचं नाव आल्यानंतर आता ती लवकरच चौकशीसाठी दिल्ली पोलिसांसमोर (Delhi Police) हजर होणार आहे. यासाठी पोलिसांनी प्रश्नांची एक लांबलचक यादी तयार केली आहे. 200 कोटींच्या खंडणी प्रकरणी सुकेश चंद्रशेखरसंबंधित जॅकलिन फर्नांडिसची चौकशी होणार आहे. दिल्ली पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा बुधवारी ही चौकशी करणार आहे.
या संदर्भात एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने एका वृत्तसंस्थेला सांगितलं, “जॅकलिनला उद्या म्हणजेच 14 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता मंदिर मार्गावरील EOW कार्यालयात तपासात सहभागी होण्यासाठी बोलावण्यात आलं आहे.” चौकशीदरम्यान जॅकलिनला विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची यादीही तयार करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. हे सर्व प्रश्न तिचं सुकेशशी असलेलं नातं आणि त्याच्याकडून मिळालेल्या भेटवस्तूंशी संबंधित आहेत. संबंधित अधिकाऱ्याने असंही सांगितलं की, यावेळी जॅकलिनला ती सुकेशला किती वेळा भेटली किंवा फोनवर संपर्क कसा केला हे देखील विचारलं जाईल.
आर्थिक गुन्हे शाखेनं पिंकी इराणीलाही चौकशीत सहभागी होण्यासाठी समन्स बजावले आहेत. इराणीनेच सुकेशला जॅकलिन फर्नांडिसशी संपर्क साधण्यास मदत केली होती. कारण ती त्या दोघांना ओळखत होती. या प्रकरणामध्ये अधिक स्पष्टता आणण्यासाठी पिंकी आणि जॅकलीन यांची समोरासमोर चौकशी होऊ शकते. या सोबतच जॅकलिनला असंही सांगण्यात आलं आहे की, तिची काही दिवस चौकशी होऊ शकते. त्यामुळे तिने दिल्लीत राहण्याच्या हिशोबाने यावं.
या प्रकरणातील आणखी एका अधिकाऱ्याने असंही सांगितलं, “जॅकलिनसाठी तयार केलेल्या प्रश्नांचा सेट हा नोरा फतेहीला विचारलेल्या प्रश्नांपेक्षा वेगळा आहे. या प्रकरणात नोरालाही चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं.” या दोन अभिनेत्रींना एकमेकांना मिळालेल्या भेटवस्तूंची माहिती होती का, हेही चौकशीत शोधण्याचा प्रयत्न केला जाईल, असंही या अधिकाऱ्याने सांगितलं. सप्टेंबर-ऑक्टोबर 2021 मध्ये नोरा फतेहीने ईडीसमोर जबाब नोंदवला होता. त्यावेळी तिने सुकेश आणि त्याची पत्नी लीना यांच्याकडून भेटवस्तू मिळाल्याचं कबूल केलं होतं.
ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिनचं आरोपपत्रात आरोपी म्हणून नाव दिलं आहे. सुकेशचा गुन्हेगारी खटल्यांमध्ये सहभाग असल्याची माहिती जॅकलिनला होती, तरीही तिने सुकेशच्या गुन्हेगारी रेकॉर्डकडे दुर्लक्ष करून आर्थिक व्यवहार केले, असं त्यात नमूद केलं आहे. जॅकलिनने 30 ऑगस्ट आणि 20 ऑक्टोबर 2021 रोजी तिचा जबाब नोंदवताना कबूल केलं होतं की तिने सुकेशकडून अनेक महागड्या भेटवस्तू घेतल्या होत्या.