Nana Patekar | 500 कोटी कमावणाऱ्या ‘गदर 2’वर नाना पाटेकरांचा निशाणा; म्हणाले “चित्रपट पाहिला पण..”
विवेक अग्निहोत्रींच्या आगामी 'द वॅक्सिन वॉर' या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचदरम्यान नाना पाटेकरांनी अप्रत्यक्षपणे सनी देओलच्या 'गदर 2' या चित्रपटावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी दिग्दर्शक अनिल शर्मा यांनाही टोला लगावला.
मुंबई | 13 सप्टेंबर 2023 : सनी देओलचा ‘गदर 2’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. तर दुसरीकडे शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटालाही प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळतोय. मात्र बॉक्स ऑफिसवरील या चित्रपटांच्या यशाने काही कलाकार फारसे खुश नाहीत. विवेक अग्निहोत्री यांच्या आगामी ‘द वॅक्सिन वॉर’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला. या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी अप्रत्यक्षपणे सनी देओलच्या ‘गदर’वर निशाणा साधला. बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करणारा चित्रपट त्यांनी पाहिल्याचं सांगितलं. मात्र चित्रपट संपेपर्यंत मी सहन करू शकलो नाही, त्यामुळे मी पूर्ण चित्रपट पाहिला नाही, असंही ते म्हणाले. हल्ली ठराविक प्रकारचेच चित्रपट बनवले जातात आणि प्रेक्षकांना ते बळजबरीने पहायला लावलं जातं, असाही टोला त्यांनी लगावला.
“आपल्या मुलाला अभिनेता बनवलं जातं आणि त्याचं अभिनय चांगलं नसलं तरी प्रेक्षकांना ते बळजबरीने दाखवलं जातं. पाच-दहा चित्रपटांनंतर प्रेक्षक त्याच्या चुका पाहणं टाळतात आणि तो जसा आहे तसा स्वीकारण्यास शिकतात. सध्याच्या चित्रपटांच्या बाबतीत हेच घडतंय. मात्र ‘द वॅक्सिन वॉर’सारखा चित्रपट जेव्हा प्रेक्षकांच्या भेटीला येईल, तेव्हा प्रेक्षकांना ते पाहत असलेले चित्रपट आणि या चित्रपटांमधील फरक स्पष्ट जाणवेल”, असं नाना म्हणाले. नाना पाटेकरांनी या मुलाखतीत कोणत्याही चित्रपटाचं किंवा कलाकाराचं थेट नाव घेतलं नाही. मात्र त्यांचा निशाणा हा ‘गदर 2’सारख्या चित्रपटावर होता, हे स्पष्ट जाणवतंय. सनी देओलच्या ‘गदर 2’ या चित्रपटातून दिग्दर्शक अनिल शर्मा यांचा मुलगा उत्कर्ष शर्माने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
याआधी नसीरुद्दीन शाह यांनीसुद्धा ‘गदर 2’वर निशाणा साधला होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी ‘द काश्मीर फाइल्स’, ‘द केरळ स्टोरी’, आणि ‘गदर 2’ यांसारख्या चित्रपटांवर ताशेरे ओढले. असे चित्रपट हिट होताना पाहून खूप त्रास होतो, असं ते म्हणाले होते. “द केरळ स्टोरी आणि गदर 2 यांसारखे चित्रपट मी पाहिले नाहीत पण मला माहीत आहे की ते कशाबद्दल आहेत. द काश्मीर फाइल्ससारखा चित्रपट इतका लोकप्रिय होत असल्याचं पाहून खूप त्रास होतो. दुसरीकडे सुधीर मिश्रा, अनुभव सिन्हा आणि हंसल मेहता हे जेव्हा चित्रपटांमधून सत्य मांडण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्यांना लोकप्रियता मिळत नाही,” अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.