“मीच बिपाशासोबत ब्रेकअप केलं..”; 23 वर्षांनंतर डिनो मोरियाने सांगितलं कारण
अभिनेत्री बिपाशा बासू आणि डिनो मोरिया हे एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. मात्र डिनोने तिच्याशी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी दोघं 'राज' या चित्रपटात एकत्र काम करत होते.

ब्रेकअप कधीच सोपं नसतं. त्याचही ब्रेकअपनंतर एकमेकांसोबत काम करावं लागल्यास गुंतागुंत अधिक वाढते. अभिनेता डिनो मोरिया त्याच्या आयुष्यातील अशाच परिस्थितीबद्दल नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत व्यक्त झाला. डिनो मोरिया आणि बिपाशा बासू एकमेकांना डेट करत होते. मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नाहीत. ब्रेकअपनंतर त्यांना ‘राज’ या चित्रपटासाठी एकत्र काम करावं लागलं होतं. याविषयी डिने म्हणाला, “खरं सांगायचं झाल्यास, बिपाशासोबत मीच ब्रेकअप केला होता. त्यामुळे तिच्यासाठी ते खूप कठीण गेलं. मी दररोज तिला सेटवर बघायचो आणि ती मला उदास दिसायची. ज्या व्यक्तीबद्दल मला खूप काळजी वाटते, त्या व्यक्तीला अशा स्थितीत पाहणं माझ्यासाठीही खूप कठीण होतं. परंतु आम्ही आधीच आमचे मार्ग वेगळे केले होते. आम्ही नातं सुधारण्यासाठी एकमेकांना संधी दिली होती, परंतु ते काही सुधारलं नाही.”
‘राज’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा अनुभव सांगताना डिनो पुढे म्हणाला, “अर्थातच तो काळ कठीण होता, कारण आम्ही दोघांनी एकमेकांसोबत खूप वेळ घालवला होता आणि अचानक आम्ही वेगळे झालो. हे होत असताना आम्ही एकत्र कामसुद्धा करत होतो. वेळेनुसार सर्व गोष्टी ठीक होतात. त्यानंतर आम्ही एकमेकांचे चांगले मित्र झालो. परंतु ब्रेकअपचा काळ खूप कठीण, भावनिक आणि रागाने भरलेला होता. हळूहळू परिस्थितीत बदल झाला.”




View this post on Instagram
डिनो मोरियासोबत ब्रेकअप झाल्यानंतर बिपाशा अभिनेता जॉन अब्राहमला डेट करू लागली होती. यामुळे जॉन आणि डिनो यांच्यात भांडण झाल्याच्याही चर्चा होत्या. याविषयी डिनोने स्पष्टीकरण देताना सांगितलं, “आमच्यात कधीच वैर नव्हतं. बिपाशासोबत माझं ब्रेकअप झाल्यानंतर आणि जॉन तिला डेट करू लागल्यानंतर लोकांनीच असं ठरवलं की माझ्यात आणि जॉनमध्ये वाद आहे. हा वाद फक्त लोकांच्या डोक्यातच होता. लोकांना असं वाटलं की त्याने माझ्या गर्लफ्रेंडला हिसकावून घेतलं, त्यामुळे मी त्याच्यावर नाराज होतो. माध्यमांनीही या चर्चांदरम्यान आगीत तेल ओतण्याचं काम केलं. पण आमच्यात खरंच काही वाद नव्हता.”
“माझं आणि बिपाशाचं ब्रेकअप झाल्याच्या वर्षभरानंतर ते दोघं एकमेकांना डेट करू लागले होते. त्यावेळी मीसुद्धा दुसऱ्या मुलीला डेट करत होतो. त्यामुळे आमच्यात वाद कसा असेल? लोकांना असं वाटलं की जॉनने माझ्या गर्लफ्रेंडला हिसकावून घेतलं. पण असं काहीच नव्हतं. आम्ही तिघं एकमेकांशी बोलायचो पण लोकांनी वेगळाच अर्थ काढला”, असं तो पुढे म्हणाला.