हे चित्रपटात का दाखवलं नाही? ‘छावा’मधील डिलिट केलेल्या सीनवर प्रतिक्रियांचा वर्षाव
अभिनेत्री दिव्या दत्ताचा 'छावा' या चित्रपटातून डिलिट केलेला सीन सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आशुतोष राणा आणि दिव्या दत्ता यांच्यातील संवादाचा हा सीन आहे. हा सीन चित्रपटात का नाही दाखवला, असा सवाल नेटकरी करत आहेत. दिव्यानेही त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेता विकी कौशलची मुख्य भूमिका असलेल्या ‘छावा’ या चित्रपटाचं प्रेक्षक-समीक्षकांकडून भरभरून कौतुक होत आहे. मात्र प्रदर्शनापूर्वी या चित्रपटाच्या वाटेत अनेक अडथळे आले होते. ऐतिहासिक कथानक असलेल्या या चित्रपटातील बऱ्याच सीन्स आणि संवादांवर कात्री चालवण्यात आली. यामधील राजमाता सोयराबाईंची भूमिका साकारलेली अभिनेत्री दिव्या दत्ता आणि हंबीरराव मोहिते यांच्या भूमिकेतील आशुतोष राणा यांच्यातील संवादाचाही सीन चित्रपटातून काढून टाकण्यात आला. मात्र आता चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर दिव्या दत्ता आणि आशुतोष राणा यांचा हा सीन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या दोघांमधील जबरदस्त संवादाचा हा सीन नेटकऱ्यांना खूपच आवडला आहे. त्यामुळे तो चित्रपटात का दाखवला नाही, असा सवाल अनेकजण करत आहेत. अशातच दिव्यानेही या डिलिट केलेल्या सीनवर प्रतिक्रिया दिली आहे.
‘बॉलिवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत दिव्या म्हणाली, “तो सीन सोशल मीडियावर पाहून मीसुद्धा चकीत झाले. अर्थातच तो माझ्या सर्वांत आवडीच्या सीन्सपैकी एक होता. पण ठीके, असं होत राहतं. ते काही माझ्या हातात नव्हतं. पण चांगली गोष्ट ही आहे की चित्रपटाला आणि मला खूप प्रेम मिळतंय.” ‘छावा’ला मिळणाऱ्या दमदार प्रतिसादाबद्दल आभार व्यक्त करत असतानाच दिव्याने तो सीन चित्रपटात दाखवायला हवा होता, अशी इच्छा बोलून दाखवली. “प्रामाणिकपणे बोलायचं झाल्यास, तो सीन चित्रपटात असता तर मला खूप आनंद झाला असता. पण ठीक आहे, माझी काही तक्रार नाही”, असं ती पुढे म्हणाली.




View this post on Instagram
चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाच्या मुलाला भेटल्यानंतरचा हा सीन आहे. हंबीरराव मोहितेंच्या भूमिकेतील आशुतोष राणा यांचे संवाद मनाला भिडणारे आहेत. या सीनमध्ये ते सोयराबाईंना स्वराज्यासाठी दिलेल्या बलिदानांची आठवण करून त्यांच्या उद्दिष्टांवर प्रश्न उपस्थित करायला भाग पाडतात. या दोघांमधील हा संवाद आणि त्यांचं अभिनय हे पाहण्यासारखं आहे. म्हणूनच नेटकऱ्यांनी त्यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘हा सीन चित्रपटात का दाखवला नाही’, असं एकाने विचारलं. तर ‘दोघांचंही दमदार अभिनयकौशल्य’ असं दुसऱ्याने म्हटलंय.