ऐश्वर्याला ‘प्लास्टिक’ म्हटल्यानंतर इमरान हाश्मीचं स्पष्टीकरण; लोक तुमच्या अंगावर धावून..
अभिनेता इमरान हाश्मीने 2014 मध्ये करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये रॅपिड फायर राऊंडदरम्यान त्याने ऐश्वर्याला 'प्लास्टिक' असं म्हटलं होतं. त्यावर आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत इमरान हाश्मी व्यक्त झाला.
मुंबई : 8 मार्च 2024 | अभिनेता इमरान हाश्मी सध्या त्याच्या आगामी ‘शो टाइम’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून तो या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करतोय. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत इमरान त्याच्या एका जुन्या वादावर मोकळेपणे व्यक्त झाला. निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये इमरानने अभिनेत्री ऐश्वर्या रायला ‘प्लास्टिक’ म्हटलं होतं. बऱ्याच वर्षांनंतर इमरानने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. इमरानने ऐश्वर्याला ‘प्लास्टिक’ म्हटल्यावरून त्यावेळी खूप मोठा वाद झाला होता.
‘कॉफी विथ करण’च्या रॅपिड फायर राऊंडदरम्यान जेव्हा करण जोहरने इमरानला विचारलं की, ‘प्लास्टिक’ शब्द म्हणताच तुझ्या डोक्यात पहिलं नाव काय येतं? तेव्हा इमरानने ऐश्वर्याचं नाव घेतलं होतं. त्याबद्दल आता स्पष्टीकरण देत तो म्हणाला, “शोमध्ये या सर्व गोष्टी मजेशीर पद्धतीने म्हटल्या गेल्या होत्या. कोणीच कोणावर टीका केली नव्हती. मात्र आता वातावरण बदललंय. आता जर तुम्ही एखाद्याबद्दल काही म्हणालात तर लोक तुमच्यावर टीका करण्यासाठी उड्याच मारू लागतात. आपण योग्य दिशेने चाललोय की नाही हे माहीत नाही. पण आजकाल आपण सर्वजण त्याच दिशेने पळतोय. त्यावेळी मात्र असं काही घडत नव्हतं.”
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत इमरानने घराणेशाहीच्या मुद्द्यावरही भाष्य केलं होतं. यावेळी अभिनेत्री कंगना रणौतवर निशाणा साधताना तो म्हणाला की तुम्ही संपूर्ण इंडस्ट्रीला ‘ड्रगी’ म्हणू शकत नाही. हे खूप चुकीचं आहे. “कोविड आणि सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर घराणेशाहीचा मुद्दा इंडस्ट्रीत खूप जास्त चर्चेत आला आहे”, असंही त्याने म्हटलं होतं.
“माझ्या म्हणण्याचा अर्थ तो नव्हता. मी ऐश्वर्याचा खूप मोठा चाहता आहे. शोचा फॉरमॅटच तसा होता. मी काहीच बोललो नसतो तर हॅम्परसुद्धा जिंकू शकलो नसतो. मला ऐश्वर्या खूप आवडते. मला नेहमीच तिचं काम आवडलंय. मला माहित होतं की लोक यावरून खूप मोठा वाद करतील. पण आपण काय करू शकतो? लोक नेहमीच कोणत्याही गोष्टीवरून तमाशा करतात”, असं इमरानने त्यावेळी स्पष्टीकरण दिलं होतं.