गोळीबारानंतर एन्काऊंटर स्पेशलिस्ट दया नायक सलमानच्या घराबाहेर दाखल; पहा व्हिडीओ
आजवर अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळलेले एन्काऊंटर स्पेशलिस्ट दया नायक यांना अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील वांद्रे इथल्या घराबाहेर पाहिलं गेलं. रविवारी पहाटे सलमानच्या घराबाहेर अज्ञातांनी गोळीबार केला. या घटनेचा तपास क्राईम ब्रांचकडून होत आहे.
अभिनेता सलमान खानच्या वांद्रे इथल्या घराबाहेर रविवारी पहाटे 5 वाजता अज्ञातांनी गोळीबार केला. या घटनेनंतर मुंबई पोलीस ॲक्शन मोडवर आहेत. गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त, लखमी गौतम आणि एन्काऊंटर स्पेशलिस्ट दया नायक यांच्यासह मुंबई पोलिस अधिकाऱ्यांचं पथक सलमानच्या घराबाहेर पोहोचलंय. दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी सलमानच्या घराबाहेर तीन राऊंड फायरिंग केली होती. यानंतर पोलिसांनी त्याच्या निवासस्थानाभोवती सुरक्षा आणखी वाढवली आहे. त्याचसोबत आरोपींचा शोध सुरू आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये पोलिस सहआयुक्त (गुन्हे शाखा), लखमी गौतम आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक सलमान खानच्या घराबाहेर दिसत आहेत.
सलमानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेचा तपास मुंबई क्राइम ब्रांच करतेय. म्हणूनच एन्काऊंटर स्पेशलिस्ट दया नायक यांना सलमानच्या घराबाहेर पाहिलं गेलंय. दया नायक यांनी आजवर अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्या नावाने केवळ छोटे-मोठे गुन्हेगारच नाही तर संपूर्ण अंडरवर्ल्ड थरथर कापतो. त्यांनी आजवर एक-दोन नाही तर 80 हून अधिक एन्काऊंटर केले आहेत. आरोपींची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी सलमानच्या घराजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज मिळवले आहेत. तर आरोपींना पकडण्यासाठी 15 पथके तयार करण्यात आली आहेत. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार झाला तेव्हा सलमान खान त्याच्या घरी उपस्थित होता. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून सलमानशी बातचित केली आहे.
पहा व्हिडीओ
#WATCH | Mumbai, Maharashtra: Two unidentified people opened fire outside the house of actor Salman Khan in Bandra.
Joint commissioner of police, crime branch, Lakhmi Gautam present at the spot. pic.twitter.com/mJAqu2wrO5
— ANI (@ANI) April 14, 2024
सलमानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे. सलमान खानला अतिरिक्त सुरक्षा पुरविली जाणार आहे. त्याच्या घराबाहेरील सुरक्षासुद्धा वाढवली जाणार आहे. पोलिसांकडून युद्ध पातळीवर आरोपींचा शोध घेतला जाणार आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी 15 ते 20 पथकं तयार केली आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी कैद झाले असून त्यांची ओळख पटवण्याचं काम पोलीस करत आहेत.