TMKOC: असित मोदी यांच्याविरोधात FIR दाखल; निर्मात्याला सतावतेय एका गोष्टीची भीती
'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेचे निर्माते असित मोदी यांच्यासोबत दोघांवर एफआयआर दाखल; निर्मात्यांच्या अडचणीत मोठी वाढ...

मुंबई | ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेचे निर्माते असित मोदी यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. पोलिसांनी असित मोदी आणि मालिकेतील अन्य दोन व्यक्तींविरोधात एफआयआर दाखल केली आहे. एफआयआर दाखल झाल्यानंतर असित मोदी आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांना अटक होणार का? अशी चर्चा सध्या जोर धरत आहे… मालिकेमध्ये मिसेस सोढीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री हिने असित मोदीवर लैंगिक छळाचा आरोप केला होता. अभिनेत्रीने असित मोदी तसेच ‘तारक मेहता’चे कार्यकारी निर्माते जतीन बजाज आणि ऑपरेशन्स हेड सोहेल रमाणी यांच्याविरोधात तक्रार केली होती. आता याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, असित मोदी, जतीन बजाज आणि सोहेल रमाणी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण याप्रकरणी तिघांना अटक झालेली नाही. गेल्या काही दिवसांपासून ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतील काही कलाकार सतत अतिस मोदी यांच्यावर गंभीर आरोप करत आहेत. एवढंच नाही तर, अनेकांनी मालिकेला रामराम देखील ठोकला आहे.
काही दिवसांपूर्वी तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये काम करणाऱ्या एका अभिनेत्रीने असित मोदीवर लैंगिक छळाचा आरोप केला होता. याप्रकरणी अभिनेत्रीने पोलिसांत जबाबही नोंदवला होता. अभिनेत्रीने सोहेल रमाणी आणि जतीन बजाज यांच्याविरोधातही तक्रार केली होती. मुलाखत आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील अभिनेत्रीने अतिस मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, ‘मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवतील याच कारणामुळे मी कोणताही खुलासा केला नव्हता…’ एवढंच नाही तर, गेल्या काही महिन्यांपासून अभिनेत्री शुटिंगसाठी देखील आली होती. शिवाय असित मोदी वेळेत मानधन देत नाहीत… असे आरोप देखील मालिकेतील अनेक कलाकारांनी केले होते.
तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेबद्दल सांगायचं झालं तर, मालिका गेल्या अनेक वर्षांपासून चाहत्यांचं मनोरंजन करत आहे. टप्पूसेना यांची धम्माल मस्ती आणि गोकूळ धाम सोसायटीमधील एकतेमुळे मालीकेने चाहत्यांच्या मनात घर केलं. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येक जण तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका तितक्याच उत्साहाने पाहतो.
मालिकेतील प्रत्येक कलाकार चाहत्याचं मनोरंजन करत आहे. पण गेल्या काही दिवसांपासून मालिकेत अनेक चढ उतार आले. ज्यामुळे मालिका तुफान चर्चेत आली. आता तर मालिकेच्या निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे..