Gadar 2 | सनी देओलच्या ‘गदर 2’चे थिएटरमधील अखेरचे काही दिवस; ‘जवान’मुळे संपतील शोज?
प्रदर्शनाला महिनाभराचा काळ उलटून गेला तरी सनी देओलचा 'गदर 2' हा चित्रपट अद्याप थिएटरमध्ये कायम आहे. मात्र शाहरुख खानच्या 'जवान' या चित्रपटापुढे त्याची जादू थोडी फिकी पडताना दिसतेय.
मुंबई | 19 सप्टेंबर 2023 : सनी देओलच्या ‘गदर 2’ या चित्रपटाने सुरुवातीच्या दिवसांमध्ये थिएटरमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला होता. 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली. मात्र ज्यावेळी शाहरुख खानचा ‘जवान’ हा चित्रपट प्रदर्शित झाला, त्यानंतर सनी देओल आणि अमिषा पटेलच्या ‘गदर 2’च्या कमाईवर हळूहळू परिणाम होऊ लागला. अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गदर 2’ हा चित्रपट आता लवकरच थिएटरबाहेर जाणार असल्याचं दिसतंय. ‘गदर 2’ हा शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडू शकतो असा अंदाज वर्तवला गेला होता. मात्र 39 दिवसांनंतरही सनी देओलचा हा चित्रपट ‘पठाण’च्या विक्रमापेक्षा बराच मागे आहे.
इंडस्ट्री ट्रॅकर ‘सॅल्कनिक’ने दिलेल्या माहितीनुसार ‘गदर 2’ने 39 व्या दिवशी फक्त 60 लाख रुपयांचा गल्ला जमवला आहे. आत्तापर्यंतच्या कलेक्शनबद्दल बोलायचं झाल्यास, या चित्रपटाने जवळपास 520.60 कोटी रुपये कमावले आहेत. 18 सप्टेंबर रोजी या चित्रपटाची एकूण ऑक्युपन्सी 12.77 टक्के होती.
‘इंडिया डॉट कॉम’ या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी चित्रपटाविषयी भाष्य केलं होतं. ‘गदर 2’ हा चित्रपट ‘पठाण’च्या रेकॉर्डला मोडणार का, असा सवाल त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले, “पठाणने चांगली कामगिरी केली, केजीएफ 2 या चित्रपटालाही प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला. आता ‘गदर 2’लाही उत्तम प्रतिसाद मिळतोय. आता हा चित्रपट कुठपर्यंत जातोय, प्रेक्षक या चित्रपटाला कुठपर्यंत घेऊन जातील, ते पाहावं लागेल. हा प्रेक्षकांचा चित्रपट आहे. आम्ही 500 कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. कदाचित भविष्यात 1000 कोटींचाही आकडा पार करू. लोकांना हा चित्रपट आवडतोय, हेच आमच्यासाठी पुरेसं आहे.”
गदर 2 हा चित्रपट थिएटरमधून गेल्यानंतर काही दिवसांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल. 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर : एक प्रेम कथा’ या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. यामध्ये सनी देओल, अमीषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा यांच्या मुख्य भूमिका आहेत.