Gadar 2 | सनी देओलच्या हँडपंपच्या सीनसाठी पाळली होती कमालीची गुप्तता; उत्कर्ष शर्माने सांगितला किस्सा
अनिल शर्मा दिग्दर्शित 'गदर 2' या चित्रपटात सनी देओलने पुन्हा एकदा तारा सिंगची भूमिका साकारली आहे. तर अमीषा पटेल त्याच्या पत्नीच्या म्हणजेच सकिनाच्या भूमिकेत आहे. तर उत्कर्षने तारा सिंग आणि सकिनाचा मुलगा चरणजीत सिंगची भूमिका साकारली आहे.
मुंबई | 12 ऑगस्ट 2023 : 22 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘गदर : एक प्रेम कथा’ या चित्रपटाने त्यावेळी बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. या चित्रपटातील गाणी, डायलॉग्स आणि सीन्स आजही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहेत. आता 22 वर्षांनंतर या चित्रपटाचा सीक्वेल ‘गदर 2’ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. शुक्रवारी 11 ऑगस्ट रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. सोशल मीडियावर पुन्हा एकदा तारा सिंग आणि सकिनाच्या भूमिकांची चर्चा होत आहे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या चित्रपटातील मुख्य कलाकार उत्कर्ष शर्मा आणि सिमरत कौर यांनी ‘गदर 2’मधील काही सीन्सबद्दल खुलासा केला. या सीक्वेलमध्ये सनी देओलचा आयकॉनिक ‘हँडपंप’वाला सीन कसा शूट करण्यात आला, याबद्दल उत्कर्षने सांगितलं.
कसं झालं शूटिंग?
‘गदर 2’मध्ये तारा सिंग आणि सकिना (सनी देओल आणि अमीषा पटेल) यांच्या मुलाची भूमिका उत्कर्ष शर्माने साकारली आहे. ‘पिंकविला’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत उत्कर्ष म्हणाला, “त्या सीनला शूट करणं सर्वांत कठीण होतं, कारण सेटवर सर्वांजवळ मोबाइल फोन होते. कोणालाही हँडपंपच्या सीनबद्दल समजलं तरी ते तो मोबाइलवर शूट करून त्याला सोशल मीडियावर अपलोड करायची इच्छा त्यांच्या मनात निर्माण होते. त्यामुळे आम्ही जाणूनबुजून सेटवर हँडपंपच्या सीनबद्दल काहीच बोलत नव्हतो.”
“हँडपंपच्या सीनबद्दल आम्ही कमालीची गुप्तता पाळली होती. कारण त्या सीनविषयी असलेली उत्सुकता आम्हाला तशीच राखून ठेवायची होती. हा सीन आम्ही सिक्रेट पद्धतीने शूट केला होता. तो शूट करताना सेटवर दुसरे कोणतेच कलाकार नव्हते. सनी देओल सरांनी सकाळी लवकर उठून हा सीन शूट केला होता. इतकंच काय तेव्हा मी आणि सिमरनसुद्धा सेटवर नव्हतो”, असं त्याने पुढे सांगितलं.
View this post on Instagram
“जेव्हा ते एक दिवस आधी लखनऊमधील लोकेशनवर शूटिंगचं प्लॅनिंग करत होते, तेव्हा लोकांनी तो हँडपंप पाहिला होता. त्याठिकाणी लोकांनी लगेच गर्दी केली होती. त्यामुळे आम्हाला लोकेशनसुद्धा बदलावं लागलं होतं. कारण तिथे त्या गर्दीत शूटिंग करणं शक्य नव्हतं”, असाही खुलासा उत्कर्षने केला.
अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गदर 2’ या चित्रपटात सनी देओलने पुन्हा एकदा तारा सिंगची भूमिका साकारली आहे. तर अमीषा पटेल त्याच्या पत्नीच्या म्हणजेच सकिनाच्या भूमिकेत आहे. तर उत्कर्षने तारा सिंग आणि सकिनाचा मुलगा चरणजीत सिंगची भूमिका साकारली आहे. अभिनेत्री सिमरत कौरने यामध्ये उत्कर्षच्या प्रेयसीची भूमिका साकारली आहे.