‘या’ प्रसिद्ध सेलिब्रिटीच्या पत्नी असती ‘ड्रीम गर्ल’, नशेत धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्या लग्नात घेतली एन्ट्री आणि…
हेमा मालिनी यांचं बॉलिवूडच्या प्रसिद्ध सेलिब्रिटीसोबत होणार होतं लग्न; पण नशेत असलेल्या धर्मंद्र यांनी लग्न मंडपात घेतली एन्ट्री आणि...

मुंबई | अभिनेते धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या नात्याची चर्चा आजही चाहत्यांमध्ये रंगलेली असते. त्यांच्यातील काही किस्से आजही चाहत्यांसमोर येत असतात. धर्मेंद्र आणि हेमा यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र स्क्रिन शेअर केलं.. सिनेमांमध्ये एकत्र काम करतना दोघांमध्ये प्रेम बहरलं. पण धर्मेंद्र यांच्यासोबत असलेलं हेमा मालिनी यांचं नातं अभिनेत्रीच्या आई – वडिलांना मान्य नव्हतं. कारण जेव्हा धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या नात्याच्या चर्चा रंगत होत्या तेव्हा धर्मेंद्र विवाहित होत. पण कोणत्याही गोष्टीचा विचार न करता धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी फक्त त्यांच्या भावनांना अधिक महत्त्व दिलं. आज दोघे त्यांच्या आयुष्यात आनंदी आहेत. पण धर्मेंद्र यांच्यासोबत लग्न होण्याआधी हेमा मालिनी यांचं एक प्रसिद्ध सेलिब्रिटीसोबत लग्न होणार होतं…
ज्या प्रसिद्ध सेलिब्रिटीसोबत अभिनेत्रीचं लग्न होणार होतं, तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेते जितेंद्र होते. हेमा मालिनी यांनी 1980 मध्ये धर्मेंद्र यांच्याशी लग्न केले, पण त्याआधी ‘ड्रीम गर्ल’ने जितेंद्रशी लग्न करण्यास होकार दिला होता. त्यामुळे जेव्हा हेमा मालिनी यांच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगते तेव्हा जितेंद्र यांच्या नावाचा उल्लेख होतो..
1970 च्या दशकाच्या सुरुवातीला जितेंद्र आणि हेमा मालिनी यांचं लग्न होणार होतं. पण दोघांच्याही नशिबाने काहीतरी वेगळेच लिहिलं होतं. हेमा मालिनी यांच्या ‘बियॉन्ड द ड्रीम गर्ल’ पुस्तकात या घटनेचा उल्लेख करण्यात आला आहे. तेव्हा, जितेंद्र आणि हेमा मालिनी केवळ कॉस्टारच नव्हते तर त्यांच्यात चांगली मैत्रीही होती. तेव्हा जितेंद्र, शोभाला डेट करत होते.. असं असताना देखील जितेंद्र यांच्या मनात हेमा मालिनी यांच्याबद्दल खास भावना होत्या…
हेमा मालिनी यांना देखील जितेंद्र आवडत होते. पण दोघांमध्ये रोमाँटिक रिलेशन नव्हतं. पण अशात अभिनेत्रीच्या आई-वडिलांनी हेमा मालिनी यांचं लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नाची बोलणी करण्यासाठी हेमा मालिनी यांचे आई-वडील जितेंद्र यांच्या घरी गेले. दोघांच्या लग्नामुळे दोन्ही कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण होतं.
दोघांच्या कुटुंबियांनी गुपचूप लग्नाची तयारी देखील केली. चेन्नईमध्ये दोघांचं लग्न होणार होतं. स्थानिक वृत्तपत्राला याचा सुगावा लागला आणि त्यांनी पहिल्या पानावर बातमी प्रसिद्ध केली. जितेंद्रची पत्नी शोभा, जी त्यावेळी त्यांची गर्लफ्रेंड होती. जितेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या लग्नाची माहिती मिळताच शोभा आणि धर्मेंद्र लग्नठिकाणी पोहचले..
या प्रकरणावर बोलताना जितेंद्र म्हणाले, ‘मी माझ्या आयुष्यातील त्या घटनेबद्दल बोलू इच्छीत नाही.. त्यांची मुलं आता मोठी झाली आहेत. माझी देखील मुलं मोठी झाली आहेत.. आता यावर बोलणं योग्य नाही…’ अखेर १९७४ साली जितेंद्र यांनी गर्लफ्रेंड शोभा यांच्यासोबत लग्न केलं आणि हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्यासोबत लग्न केलं…