“.. तर बंगालमध्ये हिंदू नामशेष होतील”; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं वक्तव्य
स्थानिक असल्याने त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसविरुद्ध भाजपच्या निवडणूक प्रचाराला चालना दिली. पश्चिम बंगालमधील पुढील विधानसभा निवडणुका पुढच्या वर्षी 2026 मध्ये मार्च ते एप्रिलदरम्यान होणार आहेत.

जर विरोधी पक्ष निवडणूक जिंकला तर पश्चिम बंगालमधील हिंदू नामशेष होऊ शकतात, असं मोठं वक्तव्य ज्येष्ठ अभिनेते आणि भाजप नेते मिथुन चक्रवर्ती यांनी केलंय. उत्तर बराकपूर इथल्या भाजपच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी यांनी हिंदूंना त्यांच्या सनातनी ओळखीचा अभिमान बाळगण्याचं आणि निवडणूक प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी होण्याचं आवाहन केलं. मिथुन चक्रवर्ती यांनी यावेळी बांगलादेशचंही उदाहरण दिलं. जर आपण त्यात अयशस्वी झालो तर आपल्या समुदायासाठी अस्तित्त्वाचं संकट निर्माण होऊ शकतो, असं ते म्हणाले.
“जर विरोधी पक्ष निवडणूक जिंकला तर पश्चिम बंगालमध्ये हिंदू बंगाली राहतील की नाही हे मला माहीत नाही. मी हिंदूंना त्यांच्या घराबाहेर येऊन मतदान करण्याची विनंती करतो”, असं त्यांनी पुढे म्हटलंय. शेजारील देशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराचा उल्लेख करताना मिथुन यांनी बांगलादेशमधील हिंदूंची परिस्थिती सांगून लोकांना सावध करण्याचा प्रयत्न केला. “बांगलादेशमध्ये राजकीय अशांततेच्या पार्श्वभूमीवर अल्पसंख्याकांना कसं वागवलं जातंय, याचा ट्रेलर आपण पाहिला आहे. त्यामुळे हिंदूंनी मतदान करण्यावर भर द्यावा”, अशी विनंती चक्रवर्ती यांनी केली.
“9 टक्के हिंदू मतदान करत नाहीत. मी तुम्हा सर्वांना ओरडून विनंती करतोय की कृपया मतदान करा. बांगलादेशने तुम्हाला एक ट्रेलर दाखवला आहे. यानंतर हिंदू बंगाली पश्चिम बंगालमधील शिल्लक राहतील का, हा एक मोठा प्रश्न आहे. खूप काळजी घ्या. हिंदूंना विरोधी पक्षाच्या बैठकांची माहिती नाही. तुम्ही तुमच्या अस्तित्वासाठी लढा”, असं आवाहन मिथुन चक्रवर्ती यांनी केलंय.




पश्चिम बंगालमध्ये भाजपचे फायरब्रँड नेते म्हणून ओळखले जाणारे मिथुन चक्रवर्ती यांनी हिंदू समुदायातील लोकांना सांगितलं की त्यांना विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये होणाऱ्या बैठकींबद्दल माहिती नाही. त्याबद्दल समजलं तर त्यांना खरंच धक्का बसेल आणि जर ते निवडणूक जिंकले तर अस्तित्वासाठी लढायला तयार राहा, असा इशारा चक्रवर्तींनी दिला.
“तुम्हाला कोणत्या बैठका होत आहेत याची माहिती नाही. त्या बैठकांबद्दल मी इथे सांगू शकत नाही. त्या विरोधी पक्षाच्या बैठका आहेत. त्यांच्या बैठकींबद्दल समजलं तर तुम्हाला धक्काच बसेल. काही दिवसांतच ते समोर येतील. मी 9 टक्के हिंदूंना बाहेर येऊन मतदान करण्याची विनंती करतोय. ही आपल्या अस्तित्त्वाची लढाई आहे”, असं आवाहन त्यांनी केलंय.
अभिनेते, राजकारणी मिथुन चक्रवर्ती, जे भारताचे डिस्को-डान्सर म्हणूनही ओळखले जातात, त्यांनी पश्चिम बंगालमधील 2021 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कैलाश विजयवर्गीय यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षात प्रवेश केला.