तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखरबद्दल होऊ शकतात मोठे खुलासे; जॅकलिनने नोंदवला जबाब
200 कोटींच्या खंडणी प्रकरणात जॅकलिन करणार मोठे खुलासे; सुकेशचं सत्य येणार समोर?
नवी दिल्ली: 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने शनिवारी आपला जबाब नोंदवला. अनेकांची फसवणूक करणाऱ्या सुकेश चंद्रशेखरशी जॅकलिनचं नाव जोडलं गेलं होतं. हे दोघं रिलेशनशिपमध्ये असताना त्याने जॅकलिनला अत्यंत महागड्या भेटवस्तू दिल्याचाही आरोप आहे. याप्रकरणी काही महत्त्वपूर्ण माहिती द्यायची आहे, असं जॅकलिननेच पोलिसांना सांगितलं. त्यानंतर दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं तिचा जबाब नोंदवला.
सध्या दिल्ली कोर्टात हे प्रकरण असून पुढील सुनावणी 12 डिसेंबर रोजी होणार आहे. त्याआधीच जॅकलिनने जबाब नोंदवला असल्याने तिच्याकडे या प्रकरणाशी संबंधित काही मोठी माहिती असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. मात्र शनिवारी नोंदवलेल्या जबाबात तिने नेमकं काय म्हटलं, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही.
15 नोव्हेंबर रोजी 2 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जॅकलिनला जामिन मंजूर झाला होता. सुकेशने जॅकलिनला दिलेल्या महागड्या भेटवस्तूंचा तपास अद्याप होणं बाकी आहे, असं जामिन देताना कोर्टाने स्पष्ट केलं होतं.
“जॅकलिनने तपासात कधीच सहकार्य केलं नाही. पुरावे सादर केले तेव्हाच खुलासा केला. तपासादरम्यान तिची वागणूक ठीक नव्हती. ती पुरावे आणि साक्षीदारांशी छेडछाड करू शकते. याप्रकरणी जेव्हा तिला इतर आरोपींसमोर बसवून प्रश्न विचारले गेले, तेव्हाच तिने कबुली दिली”, असं म्हणत ईडीने तिच्या जामिनाला विरोध केला होता.
दुसरीकडे जॅकलिननेही ईडीवर त्रास दिल्याचा आरोप केला होता. आपल्यावरील सर्व आरोप निराधार असल्याचं तिने म्हटलं होतं. जॅकलिन तपासात पूर्ण सहकार्य करतेय. मात्र ईडी तिला विनाकारण त्रास देतेय, असं तिच्या वकिलाने कोर्टात म्हटलं होतं.