‘वेरूळ लेणी पाहून मला लाज वाटली…’, जावेद अख्तर असं का म्हणाले?
javed akhtar : आईची पूजा केल्याचं ऐकलं, पण वडिलांची पूजा केल्याचं ऐकलं का?; जावेद अख्तर यांचा सवाल... जावेद अख्तर कायम अनेक मुद्द्यांवर स्वतःचं स्पष्ट मत मांडत असतात. आता देखील त्यांनी बॉलिवूड, वेरूळ लेणीबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
मुंबई | 5 जानेवारी 2024 : प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांचा बॉलिवूडमध्ये अत्यंत महत्त्वाचा वाटा आहे. जावेद अख्तर यांनी अनेक सिनेमांमध्ये गीतकार म्हणून महत्त्वाची भूमीका साकारली आहे. जावेद अख्तर फक्त त्यांच्या बॉलिवूडमधील योगदानामुळे नाही तर, अनेक मुद्द्यांवर मांडत असलेल्या स्पष्ट भूमिकेमुळे देखील चर्चेत असतात. आता देखील जावेद अख्तर यांनी बॉलिवूडमध्ये होत असलेल्या बदलाबद्दल सांगितलं आहे. पूर्वी कलाकार कामाचं श्रेय मिळावं यासाठी काम करायचे. पण आता प्रसिद्धी आणि मानधनाला अधिक महत्त्व दिलं जातं… असं जावेद अख्तर म्हणाले. शिवाय आई – वडीलांबद्दल देखील जावेद अख्तर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जावेद अख्तर यांची चर्चा रंगली आहे.
जावेद अख्तर म्हणाले, ‘सिनेमे बनवत असताना सध्याची मानसिकता मनोरंजन, समाजात जागरूकता निर्माण करण्याची राहिलेली नाही आणि कोणत्या प्रकरणात पडण्याची देखील आमची इच्छा नाही. सध्याच्या घडीला लोकं सिनेमे फक्त आणि फक्त मेट्रो शहरांसाठी बनवतात. आजकाल संस्काराचे मूळ तुटताना दिसत आहेत…’
‘माणसाची भाषा तोडली म्हणजे तुम्ही माणसाची मुळं तोडलीत.. असा त्याचा अर्थ होतो. 1965 च्या काळात सिनेमा क्षेत्रात पैसे नव्हते, जसे आज आहेत.आम्ही आंदोलनं मोर्चे केले, बदनाम झालो, आम्ही तेव्हा नियम बनवले. कामात मानधनापेक्षा श्रेय महत्वाचं आहे. आम्ही आयुष्यात पुस्तकं वाचली नाहीत. गॅरेजमधील मुलगा जसं सर्वकाही पाहून पाहून शिकतो तसे आम्ही शिकलो..’
पुढे जावेद अख्तर म्हणाले, ‘सिनेमांमध्ये कोणते शब्द वापरायचे कोणते शब्द वापरु नये.. यासाठी पोलिसांनी आम्हाला शब्दांची यादी पाठवली होती. एखादा शब्द हिंदीत नाही, परंतू इंग्रजी भाषेत वापरु शकता… असं पोलिसांनी सांगितलं.. पोलीस कधीपासून भाषेचे शिक्षक झाले..’ पुढे वेरुळ लेणीबद्दल देखील जावेद अख्तर यांनी मोठं वक्तव्य केलं…
वेरुळ लेणीबद्दल जावेद अख्तर म्हणाले, ‘वेरुळ लेणी पाहून मला माझी लाज वाटली… याआधी मी लेणी का नाही पाहिली, मला पुरेसा वेळ देता आला नाही… दगडात लेणी कोरायला जिद्द हवी…’ आई – वडिलांबद्दल अख्तर म्हणाले, ‘आईची पूजा केल्याचं अनेकदा ऐकले आहे. पण कधी वडिलांची पूजा केली असं ऐकले का ?’ असा प्रश्न देखील जावेद अख्तर यांनी यावेळी उपस्थित केला. नुकताच जावेद अख्तर यांनी वेरूळ लेणींना भेट दिली.